Khalapur Irshalgad Landslide : महाराष्ट्राची (Maharashtra News) आजची पहाट अत्यंत दुखद बातमीनं झालीये. रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इरसालवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत. दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.  


अंधार आणि पावसामुळे माती निसरडी झाल्यानं वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला बचावकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी उजेडात मदत आणि बचावकार्य जोमानं सुरु केलं जाणार आहे. सध्या 25 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 4 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप 100 जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल होणार आहेत. 


दुर्घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांचा आक्रोश 


दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या 25 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 100 जण अद्याप बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्त्या अत्यंत निसरडा आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण होऊन बसलंय. कशाचीही पर्वा न करता सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. 


पाहा व्हिडीओ : Khalapur Irshalgad Landslide : रायगडमधील इरसालवाडीवर दरड कोसळली, चार जणांचा मृत्यू



माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती 


रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इरसालवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडलीये. दरडीखाली  30 ते 40 घरं दबल्याचा अंदाज. हा आदिवासी पाडा असून यथे साधारण 250 लोकं राहातात. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. 100 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या एका जवानाचा आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचताना दम लागल्यानं मृत्यू झाल्याचंही समजतंय. मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण घटनेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला असून, मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


इरसालवाडी हा आदिवासी पाडा असून डोंगराच्या उतारावर आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, दादा भुसे तातडीने दुर्घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफची टीमही दुर्घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. बचाव कार्य जलद गतीने होण्यासाठी हायवेपासून आतील रस्ता पोलिसांकडून बंद ठेवण्यात आला आहे.  रेस्क्यूसाठी पनवेल महापालिकेचे कर्मचारीही दाखल झाले आहेत.