पुण्यात झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला टोळक्याकडून मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
मारहाण करणारे सगळे जण घटनेनंतर फरार झाले आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुणे : पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉयला पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. नळस्टॉप परिसरात हा प्रकार घडला आहे. डिलिव्हरीवरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. मारहाणीचा हा सगळा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
प्रविण कदम असं मारहाण झालेल्या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. मारहाण करणाऱ्या युवकांनी झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅपवरून जेवण मागवलं होतं. डिलिव्हरी बॉय प्रविण कदम ऑर्डर मागवलेल्या लोकेशनवर पोहोचल्यानंतर युवकांनी ऑर्डरवरून त्याच्याशी वादावादी करण्यास सुरुवात केली.
दरम्यान प्रविण एकटाच असल्याने पाच युवकांनी त्याला लाढ्याकाढ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून मारहाण करणारे सगळे जण घटनेनंतर फरार झाले आहेत. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्याने पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.