Pune Rain Update: गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यभरात पावसाने विश्रांती (Rain Update) घेतली आहे. मात्र आज पुन्हा एकदा शहर परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी (Heavy Rain) लावत आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र दिसून येत आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


पुण्यासह घाटमाथा परिसरात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Rain Update) शक्यता आहे. तर इतर ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी आला आहे. पुण्यासह (Pune Rain Update) परिसरात रिमढिम पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. 


आज कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता


रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे, सातारा जिल्ह्यातही घाट माथ्यावर मुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर आणखी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पुण्यातील चार धरणात 'इतका' पाणीसाठा


पुणे शहर परिसरातील धरणक्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा (Pune Rain Update) ओसरल्याचं दिसून येत आहे. सध्या मुळशी, टेमघर, वडिवळे या धरणक्षेत्रांत आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. पुणे शहर (Pune City) तसेच जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात कोसळणारा पाऊस आता ओसरला आहे. मात्र, चारही धरणांमधील पाणीसाठा 93.11 टक्क्यांवर पोहोचला आहे.


दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात 9 मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात 7 मिलिमीटर, पानशेत धरणक्षेत्रात 6 मिलिमीटर, तर खडकवासला धरण परिसरात अवघ्या 1 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्या टेमघर धरणातून 275 वीजनिर्मिती, 1087 क्युसेकने खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येत आहे. वरसगाव आणि पानशेत धरणांतून वीजनिर्मितीसाठी प्रत्येकी 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून शेतीसाठी नवीन मुठा उजवा कालव्यातून 1005 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.


पुण्यातील चार ही धरणे मिळून 93.11 टक्के इतका पाणीसाठा


पुणे जिल्ह्यातील टेमघर धरण 100 टक्के भरलं आहे. तर इतर चारही धरणात सद्य स्थितीत 27.14 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.


खडकवासला: 82.13 टक्के


पानशेत: 93.37 टक्के


वरसगाव: 92.59 टक्के


टेमघर: 100 टक्के