मुंबई: राज्यात सातत्याने शिवसेना आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मागणीला काही प्रमाणात यश आलं. शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष, ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भविष्यातील युतीचे संकेत दिले. तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala nandgonkar) यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी जाहीर होऊ द्या, मग पाहू, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्यावर आधी आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती, आता उद्धव ठाकरेंनीही भाष्य केलं आहे. यासंदर्भात बोलू नये, असे आदेश त्यांच्या पक्षप्रमुखाने दिले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग बोलू असेही त्यांनी म्हटले. तत्पूर्वी, याबाबत आदित्य ठाकरे यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, 5 जुलैला आम्ही एकत्र आलो होतो ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. सध्या निवडणुकांचं वातावरण दिसत आहे, जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आमच्या बाजूने आम्ही करु, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. आम्ही राजकारण पाहत नाही, आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो असेही ते म्हणाले. बाकीच्या पक्षांबद्दल मी काही बोलू शकत नाही, असे आदित्य यांनी म्हटले होते. तर, आता उद्धव ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली आहे.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना झालेल्या मारहाणीसंदर्भात बोलताना, त्याच्यावर चौकशी होऊ दे, मग बोलू असे म्हणत एका वाक्यात उद्धव ठाकरेंनी हा विषय संपवला.
काय म्हणाले होते बाळा नांदगावकर
युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया नांदगावकर यांनी होती. त्यामुळे, मुंबईसह राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना-मनसे युतीच्या चर्चा जोरकसपणे रंगू लागल्या आहेत.
12 किल्ले युनेस्कोच्या यादीत याचा अभिमान
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत आले असून याचा अभिमान आहे. मी 2010 साली पुस्तक प्रकाशन केले होते, त्यावेळी किल्ल्यांचे फोटो केले होते. माझ्या पुस्तकाचा हेतू हाच होता की, छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे किल्ले बांधून स्वराज्य मिळविले. रायगडाचे बांधकाम हिंदोजी इंदुलकरांनी केले आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तर, मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावं, असेही त्यांनी म्हटलं.
ऑगस्ट महिन्यात शेवटची आशा
शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी ही आमची सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची आशा आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह येड्या गबाळ्याला देणं हा निवडणूक आयोगाचा अधिकार असू शकत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
ठाकरे-दरेकरांची जुगलबंदी
आमदार प्रवीण दरेकर यांच्या मार्फत दरेकर समिती स्वयंपुनर्विकास या मुद्द्यावर तयार करण्यात आलेली होती. या दरेकर समितीने तीन महिने काम करून ३५०-४०० शब्दांचा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. तसेच, स्वयं पुर्नविकास प्रकल्पाचा हा अहवाल आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानसभा परिसरात उद्धव ठाकरेंनाही दिला. त्यावेळी, प्रामाणिक प्रयत्न असतील तर नक्कीच पाठींबा देईन, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. त्यानंतर, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, असे दरेकर म्हणाले. तर, हे जे बोगस आहेत त्यांना सांगा, तुझे प्रयत्न प्रामाणिक असतील, मराठी माणसाच्या हितासाठी असतील तर नक्की प्रयत्न करू, मात्र त्यासाठी तुला पुन्हा शिवसेनेत याव लागेल, असा मिशिक्ली टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. त्यावर, उपस्थितांमध्ये हशा पिकला. तर, नक्कीच साहेब, आपण सर्वच पुन्हा एकत्र येऊ, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी वेगळेच संकेत दिले आहेत.
हेही वाचा
मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; ICU मध्ये घुसला, मध्यरात्री डॉक्टरला बेदम मारहाण