Washim crime News : वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाशिमच्या (Washim crime News) सोमठाणा गावात संपत्तीच्या वादातून नातवाने आजी-आजोबांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नातवाने तीन मित्रांच्या मदतीने आजी आजोबाची हत्या केली, त्यानंतर या मृतदेहांची ओळख पटू नये यासाठी किंवा मृतदेह सापडू नये यासाठी त्यांचे हात-पाय बांधून धरणप्रकल्पात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


पोलिसांकडून होणार मृतदेहाचा शोध सुरू होता. या प्रकरणात रात्री 4 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. वाशिमच्या (Washim crime News) मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील अडाण धरणात दोन दिवसापूर्वी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान इसमाच्या अंगावर धारदार शस्त्रांने घाव केलेल्या स्थितीत मृतदेह पाण्यात तरंगलेला आढळला होता.अज्ञाताने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने हा मृतदेह धरणक्षेत्रात फेकल्याचा अंदाज पोलिसांना होता.


वाशिमच्या (Washim crime News) मानोरा पोलिसांनी शोध घेतल्यानंतर मानोराच्या सोमठाना गावातील मृतक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून प्रल्हाद वीर असे मृताचे नाव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, जेव्हा मानोरा पोलीस मृतकाच्या घरी पोहचले तेव्हा घराला कुलूप दिसले. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावल्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर घरात रक्तांचे डाग आढळले. यावरून याच घरात प्रल्हाद वीर या वृद्धांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला.


पोलिसांच्या तपासात प्रल्हाद वीर आणि वयोवृद्ध निर्मला वीर हे बेपत्ता असल्याने पोलिसांना दोघांची हत्या झाल्याचा संशय निर्माण झाला. संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय बळावला,त्यानंतर त्यांचा नातू प्रतिक वीर याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले. त्याची कसून तपासणी केल्यानंतरआरोपीने हे हत्याकांड घडवले असून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी 4 आरोपी अटक केले आहे. 


आरोपी प्रतीक संतोष वीर, जग्गू देवकर, विकास भगत, सर्वांनी संगनमत करून प्रल्हाद वीर आणि निर्मला वीर यांना कोयताने मारून हातपाय बांधून पुलावरून खाली फेकून दिले. गुन्हा करताना वापरलेली कार देखील जप्त केली असून निर्मला वीर यांचा मृतदेह शोधण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संपत्तीसाठी नातवाने आपल्या आजी आणि आजोबाची जीव घेतल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे.