पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू
कामशेत येथे तीन शेतकऱ्यांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. खंडू शिरसाठ, शोभा शिरसाठ आणि सुनंदा कचरे अशी मृतांची नावं होती.

पिंपरी-चिंचवड : ऐन दिवाळीत आलेल्या पावसाने तिघांवर काळाचा घाला घातला आहे. दोन विविध घटनांमध्ये पुण्याच्या कामशेत येथे तीन शेतकऱ्यांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. खंडू शिरसाठ, शोभा शिरसाठ आणि सुनंदा कचरे अशी मृतांची नावं होती.
खंडू शिरसाठ आणि शोभा शिरसाठ हे दोघे त्यांच्या नेसावे गावातील शेतात कामनिमित्त गेले होते. आपापल्या शेतात काम सुरू असतानाच पाऊस आला म्हणून दोघांनी एकाच झाडाचा आसरा घेतला. त्यावेळी झाडाखाली आसरा घेतलेल्या खंडू यांच्या हातावर आणि शोभा यांच्या पाठीमागून खांद्यावर वीज पडली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
तर कचरेवाडी गावातील सुनंदा कचरे या पावसामुळे भाताचं नुकसान होऊ नये यासाठी शेतातील भाताचा पेंडा झाकत होत्या. दरम्यान वीज पडल्याने सुनंदा यांचाही जागीच मृत्यू झाला. वीज पडल्याने सुनंदा यांची उजवी बाजू पूर्ण जळाली.
कामशेत पोलीस आणि मावळ तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तिघांच्या मृत्यूने तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Before You Go
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?






















