एक्स्प्लोर
न्याय देणारं सरकार येऊ दे, अजित पवारांच्या पत्नीचं पांडुरंगाला साकडं
‘सध्या बळीराजाचे हाल चालले आहेत. त्यामुळे सगळ्या जनतेच्या इच्छेप्रमाणे त्यांना न्याय देणारं सरकार येऊ दे,’ अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी सांगितले.

बारामती : ‘बळीराजा सुखी होऊ दे आणि सर्वांच्या इच्छेप्रमाणे न्याय देणारं सरकार येऊ दे,’ असं साकडं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पांडुरंगाला घातलं आहे. काटेवाडी मध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळी सुनेत्रा पवार पालखीसोबत काही अंतर चालल्या. ‘सध्या बळीराजाचे हाल चालले आहेत. त्यामुळे सगळ्या जनतेच्या इच्छेप्रमाणे त्यांना न्याय देणारं सरकार येऊ दे,’ अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी सांगितले. दरम्यान, काटेवाडी येथे आज धोतराच्या पायघड्या टाकण्यात आल्या. यानंतर पालखी सोहळ्याचे तीन वाजता काटेवाडी येथील बसस्थानकाजवळ मेंढपाळांच्या मेंढ्यांनी पालखीच्या रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केलं. या उत्साही व वैशिष्ट्यपूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. यानंतर संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील सणसर या ठिकाणी मुक्कामास रवाना झाला.






















