(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवजात बालकाची व्हेंटीलेटरच्या सहाय्याने 22 दिवसात कोरोनावर यशस्वी मात
जन्मताच बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये भरती केलं असता बाळाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्याचबरोबर बाळाला न्युमोनिया झाल्याचही उघड झालं.
पुणे : जन्माला येताच कोरनाबाधित झालेल्या एका बाळानं व्हेंटिलेटरच्या मदतीने तब्बल 22 दिवस दिलेला लढा यशस्वी ठरलाय. 35 दिवस आयसीयुमध्ये उपचार घेतल्यावर हे बाळ पुर्ण बरं झालंय. या बाळावर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. 12 जुलैला प्रकाश सूर्यवंशी आणि आकांक्षा सूर्यवंशी यांना मुलगा झाला. परंतु जन्मताच बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये भरती केलं असता बाळाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्याचबरोबर बाळाला न्युमोनिया झाल्याचही उघड झालं.
बाळाच्या फुफ्फुसांमध्ये अनेक प्रकारच्या गुंतागुंत निर्माण झाल्या. त्यानंतर या बाळावरती भारती हॉस्पिटलच्या एनआयसीयुमध्ये उपचार सुरू झाले. महत्त्वाचं म्हणजे हे बाळ प्री मॅच्युअर बेबी होतं म्हणजे वेळेआधीच जन्माला आलं होतं. त्यामुळे या बाळाचं वजन जन्मावेळी फक्त 1.8 किलो इतकं होतं. श्वास घेता यावा यासाठी एवढ्या लहान बाळाला व्हेंटिलेटरची मदत देण्यात आली. त्याचबरोबर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी सर्फेंक्ट नावाच्या विशेष औषधाचे दोन डोसही देण्यात आले आहे . हे सर्व होऊनही बाळाला शंभर टक्के ऑक्सीजन आवश्यक होता. त्यासाठी त्याला हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं तरीही ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा ठरत नसल्यामुळे बाळाला नायट्रिक ऑक्साइड नावाचा एक विशेष वायू देखील देण्यात आला त्याचबरोबर बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबोलीन ही एक विशेष थेरपी देखील करण्यात आली . डॉक्टरांकडून एवढे सगळे उपाय करण्यात आल्यानंतर हे बाळ उपचारांना प्रतिसाद द्यायला लागलं.
सलग 22 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर बाळ स्वतः श्वासोच्छवास करण्यास सक्षम झालं आणि त्यामुळे बाळाचा वेंटिलेटर काढण्यात आला असं बाळावरती उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी यांनी सांगितलं. एखाद्या मोठ्या व्यक्तीला ज्या प्रकारे स्टेरॉइडचे डोस दिले जातात तसेच या बाळाला द्यावे लागले. डॉक्टर सूर्यवंशी यांच्या मते अशाप्रकारे एखादं बाळ जन्मता: कोरोना पॉझिटिव्ह असणे यात काही नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक केसेस गेल्या काही महिन्यांत समोर आलेल्या आहेत . परंतु या बाळाच्या बाबतीत अनेक अडचणी होत्या सर्वात पहिली अडचण म्हणजे हे बाळ प्री मॅच्युअर बेबी होतं आणि त्याला न्यूमोनिया झाल्याचेही स्पष्ट झालं होतं. मात्र अनेक प्रकारच्या थेरपीचा उपयोग आम्ही केला. खरं तर हे सगळे प्रयोग होते आणि बाळानी ही या प्रयोगांना चांगला प्रतिसाद दिला. या बाळावर करण्यात आलेले उपचार दिशादर्शक ठरतील असा दावा डॉक्टर सुर्यवंशी यांनी केलाय. तर बाळ आता व्यवस्थित असल्याचं सांगताना बाळाच्या काकी नीलिमा सूर्यवंशी यांनी आनंदाश्रू दाटुन आले. जेव्हा बाळाला श्वास घेण्यास त्रास आहे असं डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा सगळं कुटुंब तणावाखाली होतं आणि त्यानंतर पुढचे पंचवीस ते तीस दिवस याच नावाखाली संपूर्ण कुटुंबाला राहावं लागलं हे सांगताना नीलिमा सूर्यवंशी या भावूक झाल्या. परंतु आता बाळ एकदम व्यवस्थित असल्याचं सांगतानाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.
How to use mask? तुम्ही मास्क योग्य पद्धतीने वापरताय? मास्कचा वापर योग्यरित्या कसा करावा?