(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक
Shivshahir babasaheb Purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Shivshahir Babasaheb Purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरु आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआ झाला असून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली.
काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचे बाबासाहेब पुरंदरेंचे मुलगे अमृत पुरंदरे यांनी सांगितले. बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' देऊन गौरव केला होता.
बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. 'जाणता राजा' या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले.
राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.