Sharad Pawar : 'मलाही कॅन्सर झाला, मी त्यांना सांगितलं होतं...'; शरद पवारांनी सांगितला आमदार लक्ष्मण जगताप यांचा 'तो' किस्सा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव परिसरातील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
Sharad Pawar On Lakshaman jagtap Death : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshamn Jagtap) यांचं 3 जानेवारीला कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव परिसरातील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांनी केलेल्या कामाचं कौतुकही केलं.
लक्ष्मण जगताप यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना शरद पवारांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, लक्ष्मण जगताप यांचं निधन कॅन्सरने झालं. कॅन्सर हा आजार मलादेखील झाला होता. ज्यावेळी मला लक्ष्मण यांना कॅन्सर झाल्याचं कळलं, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की कॅन्सर या आजारासोबत लढावं लागतं. त्यावेळी मी त्यांना मानसिक धीरही दिला होता. लक्ष्मण जगतापदेखील मला म्हणाले होते की होय मी कॅन्सरशी लढत आहे. मात्र दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सगळे सोबत आणि सहभागी असल्याचं देखील ते म्हणाले.
लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात माझ्यासोबतच झाली. काँग्रेसमध्ये आम्ही असताना पिंपरी चिंचवडमधील 6-7 जण होते त्यात ते एक लक्ष्मण जगताप होते. नंतर त्यांनी जनसंपर्क वाढवला आणि स्वतःची ओळख निर्माण केली. कालांतराने ते वेगळ्या पक्षात गेले. मात्र त्यांनी संपर्क तोडला नाही. ते आधी नगरसेवक त्यानंतर महापौर, शहराध्यक्ष, आमदार झाले मात्र त्यांचे पाय कायम जमिनीवर असायचे, असं म्हणत त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचं कौतुक केलं.
अजित पवारांकडून कुटुंबियांचं सांत्वन
काल (5 जानेवारी) विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील लक्ष्मण जगताप यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्यांनीही काही आठवणींना उजाळा दिला होता. त्यावेळी ते म्हणाले, विधानपरिषदेच्या 2004 च्या निवडणुकीवेळी मी लक्ष्मण जगताप यांना सांगितलं होतं, तू अपक्ष उभा राहा. मी सांगेपर्यंत मोबाईल स्विच ऑन करु नको. वरिष्ठांचा दबाव होता. कारण त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार समोर उभे होते. तरीही मीच त्यांना उभं केलं आणि ते अपक्ष म्हणून अधिक मताधिक्याने निवडून आले. लक्ष्मण जगताप 2014 मध्ये भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे दादांसोबत असणारा जिव्हाळा नेहमी दिसून आला. आज त्याची प्रचिती या निमित्तानेही आली.
पवारांनी जपलं राज्यातील राजकारणाचं वेगळेपण
पक्ष वेगळे असले आणि विरोधक असले तरी देखील प्रकृतीची विचारपूस करणं आणि संकटात एकमेकांची साथ देणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती आहे. देशात अनेकदा महाराष्ट्राच्या याच हटके राजकारणाची चर्चा होते. शरद पवारांनी गोरेंची घेतलेली भेट राज्यातील राजकारणाचं वेगळेपण जपते.