मुंबई: कुख्यात डॉन शरद मोहोळच्या  (Sharad Mohol) पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची भेट घेतली. कुख्यात डॉन शरद मोहोळ यांची दोन दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वाती मोहोळ यांनी फडणवीसांची भेट घेतली. स्वाती मोहोळ या पुणे भाजपच्या पदाधिकारी आहेत. शरद मोहोळ यांच्या खुन्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केल्याची माहिती आहे.


शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. स्वाती मोहोळ यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली. 


शरद मोहोळ हत्या प्रकरणाचे वकील कनेक्शन


शरद मोहोळवर गोळीबार करणारे  मारेकऱ्यांनी सातारच्या दिशेने वाहनातून पळायचं ठरवल होतं.  मात्र त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन पुणे पोलिसांनी लागलीच त्यांचा पाठलाग सुरु केला आणि शिरवळ जवळ पाठलाग करून आठ जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. या आठ आरोपीमध्ये या दोन वकिलांचा देखील सहभाग आहे. आरोपींना पळून जाण्यास वकिलांनी मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 


शरद मोहोळच्या हत्येचा थरारक व्हिडीओ समोर


शरद मोहोळने शुक्रवारी त्याच्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, शरद मोहोळसोबत सावलीप्रमाणे चालणाऱ्या त्याच्या साथीदारांनीच त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 


24 तास सोबत असणाऱ्या अंगरक्षक बनून सुरक्षा करणाऱ्यांनीच शरद मोहोळचा घात केला. साहील पोळेकर, विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे हे तिघेही मोहोळसोबत सावलीसारखे असायचे. शुक्रवारीसुद्धा ही मंडळी मोहोळसोबतच होती. अगदी मोहोळच्या लग्नाचा वाढदिवसही त्यांनी साजरा केला. पण हीच मंडळी काही वेळात आपला घात करणार याची पुसटशीही कल्पना मोहोळला नव्हती आणि पुढे हे असं सगळं घडलं. 


ही बातमी वाचा :