पुणे : 100 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या नाटकाविषयीच्या प्रेमाबद्दल भाष्य केलं. नाटक पाहिलेला माणूस हा महाराष्ट्रात नाही असं होणारच नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही, तसं नाटकाला ही रिटेक नसतो. खरं तर हल्ली सकाळी सकाळी बातमी पाहिली की म्हणावं वाटतं की थोडं रिटेक घ्या, असं म्हणत राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला. या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी मराठी कलाकरांचे कान टोचलेत. मराठी कलाकरांनी व्यासपीठावर,चारचौघात एकमेकांना मान द्यायलाच हवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
पुण्यात 100 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलानाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यसंमेलानादरम्यान दीपक करंजीकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या नाटकाच्या प्रेमाविषयी भाष्य केलं. तसेच त्यांनी मराठी कलाकरांना देखील सल्ले दिले. खरं तर मला हुरहूर होती, की दुपारच्या जेवणानंतर मंचासमोर कोणी असेल का? की फक्त प्रश्न-उत्तरं होतील असं वाटलं होतं. पण तुम्ही उपस्थित आहात, त्याबद्दल आभार. आता विषय काय आहे, "नाटक आणि मी" त्यापेक्षा "मी आणि माझी नाटकं" असा विषय असता तर तो विषय खूप रंगला असता, मात्र आयोजकांना त्यात रसचं नाही. आता नाटक म्हणून माझी मुलाखत घ्यावी इतकं माझ्यात काही नाही, फक्त नाटक एवढंच माझ्यात आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
मराठी माणूस महाराष्ट्राचा इतिहास विसरतोय
आपला मराठी माणूस हा महाराष्ट्राचा इतिहास विसरला आहे. खरं तर आपण राज्यकर्ते होतो आपण, देशाचा पंतप्रधान मराठा साम्राज्याने बसवला. आपण सगळे जातीपातीत भांडत बसलोय. आता ही जात पात फक्त राजकारणात नाही तर नाटकात, शाळेत ठिकठिकाणी आलेली आहे. हे दुर्दैव आहे.
मराठी कलाकरांनी एकमेकांना मान द्यायलाच हवा
मराठी कलाकारांनी एकमेकांना मान द्यायला हवा. पहिली आणि शेवटची गोष्ट तुम्ही कलाकारांनी एकमेकांना मान दिला नाही अन नको त्या नावाने एकमेकांना हाका देत बसलात तर मराठी चित्रपटसृष्टीतून एक ही स्टार निर्माण होणार नाही. इतर राज्यातील कलाकारांकडे बघा. रजनीकांत आणि इलाहीराजा रात्री एकत्र बसून दारू बसत असतील, मात्र मंचावर आले की ते एकमेकांना सर म्हणून आदर देतात. मराठी कलावंतांनी याचं अनुकरण करायला हवं. मानसन्मान द्या. तुम्ही जर नाक्यावर उभं राहिला तर तुम्हाला कोणी पैसे देऊन पाहायला येणार नाही. आज अशोक सराफ हे चौकात उभे राहिल्याचे दिसले नाहीत, म्हणून मी पैसे मोजूनचं त्यांना पाहायला जाईन. आता इथं प्रशांत दामले अध्यक्ष आहेत. आता मी चार भिंतीत त्यांना काहीही म्हणेन, मात्र इथं मी त्यांना सर म्हणेन. आता अशोक सराफांना हे काय म्हणतात मामा, अरे तुझा काय सख्खा मामा आहे का? अरे सर म्हणा ना? आता शरद पवार इथं आले तर मी त्यांना वाकून नमस्कार करेन, कारण ते वरिष्ठ नेते आहेत. माझ्या भाषणात मी त्यांच्यावर बोलेन मात्र समोर आल्यावर त्यांचा त्यांना मानसन्मान देईनच. त्यामुळं मराठा कलावंतांनी ही गोष्ट पाळायला हवी, असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठी कलावंतांचे कान टोचलेत.
तर सासू सूनेत खरी भांडणं होतील
मला निवडणूक लढायला लाज वाटते. कारण गेली 70 वर्षे काय तर माझे आजोबा, काका जे बोलले आज मी ही तेच बोलतोय. अरे तेच ते विषय, मग आपण पुढं कधी जाणार? नाटक, कलाकार, साहित्यिक हे नसते तर कधीच अराजकता आली असती. कारण लोक तुमच्यात गुंतून पडला त्यामुळं दुसरीकडे दुर्लक्ष झालं. तुम्ही जर रात्रीच्या मालिका बंद केल्या तर सासू सुनांमध्ये खरी भांडणं होतील. म्हणून तुमचे आभार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
लतादीदींच्या पुस्तकावर काम सुरु
मी लतादींदींना जेव्हापासून भेटलो तेव्हापासून त्यांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. लताताईंनी माझ्याशी संवाद साधताना ते प्रेम दिलं. पहिला फोन आला तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही का फोन केला, मग मीच जाऊन भेटलो. त्यांचे आणि माझे संबंध खूप घनिष्ठ होते. सध्या मी त्यांच्यावरील पुस्तकाचं काम करतोय.
हेही वाचा :
Sharad Pawar : शरद पवार यांची 'रायगडाला जेव्हा जाग येते' नाटकावर अप्रत्यक्ष टीका; नेमकं प्रकरण काय?