Pune Crime News : पुण्यातील (Pune) कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या (Sharad Mohol Murder Case) हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन वकिलांचा सुद्धा समावेश आहे. पोलिसांनी या दोन्ही वकिलांना अटक केल्यावर न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, न्यायालयात आपली बाजू मांडतांना यातील एक वकिलाला अक्षरशः रडू कोसळले. तसेच आम्ही काहीही केले नाही, असेही हे वकीला यावेळी म्हणाले.
शरद मोहोळ खून प्रकरणात 6 तरुणांसह 2 वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, या सर्व आरोपींना पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले होते. यातील दोन्ही वकिलांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ॲड रवींद्र पवार आणि ॲड संजय उड्डाण असे या वकिलांचे नाव आहे. मात्र, यावेळी न्यायालयासमोरच यातील एका वकिलाला रडू आल्याचे पाहायला मिळाले.
पोलिसांनी आमचे ऐकले नाही
दरम्यान, न्यायालयात आपली भूमिका मांडतांना वकील म्हणाले की, "आम्हाला आरोपींचा फोन आला की, त्यांनी खून केला असून, त्यांना सरेंडर व्हायचे आहे. आम्हीही त्यांना तोच सल्ला देत, त्याची माहिती पोलिसांना फोनद्वारे कळविली" असे या वकिलांनी न्यायलायात सांगितले. आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही आम्ही तेच सांगितले. पण पोलिसांनी आमचे ऐकले नाही'' अशा शब्दात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका वकिलाने आपली बाजू मांडली. तर, आम्ही 15 वर्ष वकीली व्यावसायात आहोत, आम्ही काहीही केले नाही, असे सांगताना दुसऱ्या वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर झाले.
अन् शरद मोहोळचा 'विश्वास'घात झाला...
शरद मोहोळ हत्याकांडातील आरोपींची ओळख पटली असून, एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे नियोजन पद्धतीने ही हत्या करण्यात आली आहे. शरद मोहोळची हत्या करणारे मारेकरी त्याचे साथीदार म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या टोळीत काम करत होते. यातील साहील पोळेकर हा तर हत्येच्या आधी काहीवेळ शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात देखील सहभागी होता. वरवर शरद मोहोळचे साथीदार असल्याचे दाखवणारे हे मारेकरी शरद मोहोळच्या गटात त्याला संपवण्यासाठीच सहभागी झाले होते अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणे होती. तर साहील पोळेकर याच्यासोबत देखील जमीन आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते. याचाच राग मनात ठेवून त्यांनी शरद मोहोळसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवस त्याच्यासोबत राहून त्याचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर शरद मोहोळच्या हत्येची योजना आखली. अतिशय थंड डोक्याने नियोजन करत त्यांनी ही हत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: