पुणे: आपण अनेकदा खतरनाक गुंडांच्या हत्या झाल्याच्या बातम्या पाहिल्यात. अनेकदा जवळच्याच व्यक्तींनी हत्या केल्याचंही समोर आलंय. शरद मोहोळच्या (Sharad Mohol) बाबतीतही तेच झालं. खांद्याला खांदा लावून पुण्यात दहशत पसरवणारे, कायम सावलीसारखे सोबत असणारे साथीदारच, शरद मोहोळसाठी काळ बनून आले आणि त्याचा खात्मा करून गेले. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या आयुष्यातले अखेरचे 10 सेकंद सीसीटीव्हीत चित्रीत झालेत आणि आता ते व्हायरलही झाले आहे.
घराबाहेर आधीच फिल्डिंग लावली होती (Sharad Mohol Murder CCTV)
शुक्रवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटं आणि 40 सेकंद, शरद मोहोळ लग्नाचा वाढदिवस साजरा करून आपल्या साथीदारांसह घराबाहेर आला. घराबाहेर शरद मोहोळसाठी आधीच फिल्डींग लागली होती. मोहोळ कधी घराबाहेर पडणार, त्याला कसं संपवायचं याचं प्लॅनिंग झालं होतं. त्यानुसार ठरल्यानुसार पांढरी टोपी घातलेला एक मारेकरी आधीच मोहोळच्या चाळीबाहेर येऊन दबा धरून बसला होता.
शरद मोहोळचा खेळ खल्लास
ठरलेल्या पॉईंटवर मोहोळ आला आणि सुरू झाला बेछूट गोळीबार. मोहोळच्या मागून चालत आलेल्या काळ्या शर्टातल्या बॉडीगार्डने त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या चालवल्या. त्याचवेळी मोहोळच्या डावीकडून, चाळीच्या तळमजल्याकडून पांढरी टोपी घातलेला गुंड गोळीबार करत पुढे आला. एकाच वेळी दोन बाजूंनी झालेल्या गोळीबारात शरद मोहोळ विकल अवस्थेत खाली कोसळला.
ही घटना घडली त्यावेळी दुपारचे 1 वाजून 20 मिनिटं आणि 50 सेकंद झाले होते. मोहोळ खाली कोसळल्यावर त्याच्या उरलेल्या दोन साथीदारांनी मारेकऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथून निसटण्यात मारेकरी यशस्वी झाले. या घटनेनंतर एकच कल्लोळ उडाला.
शरद मोहोळला वाचवण्यासाठी त्याच्या साथीदारांनी तसंच परिसरातल्या लोकांनी प्रयत्न केले. मात्र तोवर उशीर झाला होता. मोहोळच्या मानेत, छातीत, खांद्यात गोळ्या लागल्या. पुणे अंडरवर्ल्डमध्ये स्वतःच्या नावाची दहशत माजवणारा शरद मोहोळ असा अखेर 10 सेकंदात त्याच्याच लोकांनी संपवला.
24 तास सोबत असणाऱ्या अंगरक्षक बनून सुरक्षा करणाऱ्यांनीच शरद मोहोळचा घात केला. साहील पोळेकर, विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे हे तिघेही मोहोळसोबत सावलीसारखे असायचे. शुक्रवारीसुद्धा ही मंडळी मोहोळसोबतच होती. अगदी मोहोळच्या लग्नाचा वाढदिवसही त्यांनी साजरा केला. पण हीच मंडळी काही वेळात आपला घात करणार याची पुसटशीही कल्पना मोहोळला नव्हती आणि पुढे हे असं सगळं घडलं.
ही बातमी वाचा: