Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा, मोर्चाला कोण कोणते नेते राहणार उपस्थित?
Santosh Deshmukh Case : उद्या सकाळी 10 वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. दरम्यान या मूक मोर्चासाठी अनेक नेते हजेरी लावणार आहेत.
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील (Beed Crime) सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्याचं वातावरण चांगलंच तापलं असून या घटनेचा निषेध केला जात आहे. ही घटना घडून अनेक दिवस उलटले आहेत,मात्र, या घटनेचा मुख्य सूत्रधार फरार आहे, त्यामुळे परिसरातील नागरिक आणि देशमुख कुटूंबीय संतप्त झाले आहेत. या घटनेविरोधात उद्या ( शनिवारी 28 डिसेंबर) बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित या मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले आहेत. ‘संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या‘ असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आला आहे. उद्या सकाळी 10 वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. दरम्यान या मूक मोर्चासाठी अनेक नेते हजेरी लावणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा. यासाठी अनेक नेते 28 तारखेच्या मोर्चाला हजेरी लावणार आहेत.
कोणते नेते राहणार उपस्थित
खासदार बजरंग सोनवणे,
आमदार संदीप क्षीरसागर,
आमदार प्रकाश सोळंके,
आमदार सुरेश धस,
आमदार जितेंद्र आव्हाड,
अंजली दमानिया,
मनोज जरांगे पाटील,
छत्रपती संभाजी राजे भोसले, आदी नेते आणि नागरिक या ठिकाणी हजेरी लावणार आहे.
धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला पोलिसांच्या हवाली करावे - क्षीरसागर
संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन आणि वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या संबंधामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या संदर्भात आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एबीपी माझाशी बोलताना वाल्मीक कराडला धनंजय मुंडेनी पोलिसांकडे सुपूर्द करावंं, असं म्हटलं आहे.
मला ज्यावेळी या प्रकरणात लोकांचा मोठा आक्रोश दिसतात त्याचवेळी मी 28 तारखेला मोर्चा काढायचं ठरवलं. मी पहिल्यांदा वाल्मीक कराड याचं नाव घेतलं आणि पोलिसांच्या सीडीआरमध्ये सुद्धा वाल्मीक कराडचे नाव आहे, मग का नाही वाल्मीक कराडला अटक करत? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आम्ही या घटनेचा कधीच राजकारण केले नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीने या प्रकरणाचा तपास लावण्याची घोषणा केली. हे राजकीय प्रकरण नाही, हे गुन्हेगारीचे प्रकरण आहे आणि या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये सगळ्या प्रकारचे लोक उद्या एकत्र येणार आहेत. आज 18 दिवस झाले आहेत या घटनेला वाल्मीक कराड पोलिसांना सापडत नाही, माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आक्रोश कमी होणार नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.