पुणे: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती अॅग्रोवरील ईडीच्या कारवाईनंतर (ED Action On Baramati Agro) आता राज्याचं राजकारण तापत असल्याचं चित्र आहे.  मी काही चुकीचं केलं असतं तर देशात परत आलो नसतो, अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी (Rohit Pawar) दिली. शुक्रवारी ईडीने बारामती अॅग्रोवर धाड टाकली होती. त्यानंतर रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर  हल्लाबोल केला. 


गेल्या सात दिवसामागे दिल्लीला कोण कोण गेलं होतं त्याची माहिती घ्या, त्यामध्ये भाजपचे आणि अजित पवारांचे कोण सोबती गेले होते याची माहिती घ्या. त्यानंतर सर्व घटनाक्रम लक्षात येईल असं रोहित पवार म्हणाले. आपण काही चुकीचं केलं असतं तर देशात परत आलोच नसतो, अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो असंही रोहित पवार म्हणाले. 


दरम्यान, रोहित पवारांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. रोहित पवारच्या प्रश्नाला उत्तर द्यावं, इतका तो मोठा झालेला नाही, तो बच्चा आहे, त्यावर माझे प्रवक्ते बोलतील असं ते म्हणाले.


काय म्हणाले रोहित पवार? 


ईडीने कारवाई केली त्यावेळी आपण परदेशात होतो. मी काही चुकीचं केलं असतं तर मी आज सकाळी लगेच आलो नसतो. अधिकाऱ्यांचं काही चुकत नाही. ज्या गोष्टी मला माहित नाहीत त्या मिडीयाकडून कळतंय. हा विषय ईडी आणि आमच्यातील विषय होता. पण काहींना राजकारण करायचं आहे. 





 
रोहित पवार म्हणाले की, आमच्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे. महाराष्ट्र धर्म आणि विचार महत्त्वाचा आहे. यात काही नेते आमच्या कंपनीत घोटाळा झाल्याचं मोठ्या आवाजात सांगत आहेत. यात काही मनी लाँड्रिंगचा काही विषय नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांवरही आपला काही आक्षेप नाही. आमच्याकडून त्यांना पूर्ण सहकार्य असेल. या आधी ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली त्यांची यादी एकदा पब्लिश करा. आता ते नेते त्याच पक्षात आहेत की भाजपमध्ये गेलेत याचीही माहिती घ्या. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या शहरात असतात, त्या शहरात दिवसाढवळ्या खून होतात. फडणवीस यांनी कोणतेतरी एकच पद सांभाळावं. त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. 


आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थितपणे सहकार्य केले. ईडीच्या अधिकाऱ्यांबाबत माझा कोणताही आक्षेप नाही. मात्र आज आमच्यावर कारवाई होत आहे. ज्यांच्यावर भाजपने आरोप केले होते. त्यांच्यावरील कारवाया का थांबवण्यात आल्या आहेत? असा सवालही रोहित पवार यांनी केला.


शुक्रवारी बारामती अॅग्रो कंपनीची ईडीकडून 14 तास चौकशी करण्यात आली. ईडीचे अधिकारी या कंपनीचे काही कागदपत्रे घेऊन गेल्याची सूत्रांची माहिती आहे.


ही बातमी वाचा: