पुणे: दीड वर्षापूर्वी मी शिवसेना वाचवण्याची भूमिका घेतली, पण ज्यांनी सातत्याने खोटं बोलनू अनेकांचा अपमान केला त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाची शिरूर मतदारसंघातील खेड या ठिकाणाहून सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अजित पवारांनी दावा केलेल्या या मतदारसंघातील शिवाजीराव अढळराव पाटलांच्या (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या उमेदरवारीवर मात्र मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत. 


अढळरावांच्या उमेदवारीवर कोणतंही भाष्य नाही


पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाने या आधीच दावा केला असून या ठिकाणाहून इच्छुक असलेले उमेदवार आणि माजी खासदार अढळराव पाटील हे शिंदें गटात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर काही बोलणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अढळरावांच्या कामाचे कौतुक केलं, मात्र त्यांच्या उमेदवारीवर कोणतंही भाष्य केलं नाही. 


शिवसेना वाचवण्याची भूमिका मी घेतली


ठाकरेंची साथ सोडून आपण दीड वर्षापू्र्वी शिवसेना वाचवण्याची भूमिका घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, "खोटं बोलून त्यांनी युती तोडली, हजारो लाखो माणसांचा विश्वासघात केला, त्यांनी शिवसैनिकांशी गद्दारी केली, त्यांना आता धडा शिकवायची वेळ आली आहे. आता आपल्या पक्षात रोज लोक प्रवेश करतात, मग मी जर चुकलो असतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली असती का? हजारो, लाखो शिवसैनिक विश्वासाने भगवा खांद्यावर घेत आहेत. शिवसेना वाचवण्याची भूमिका मी घेतली."


एकनाथ शिंदे म्हणाले की, एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा बाळासाहेबांनी केली होती, 1995 साली सत्ता आल्यानंतर बाळासाहेबांनी ठरवलं असतं तर ते मुख्यमंत्रीपदी बसले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. मुख्यमंत्रीपदाची संधी आली त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांनी उडी मारून त्या जागी बसले.


आपल्याला मोदींचे हात बळकट करायचे आहेत


आपल्याला महाराष्ट्रातून 45 हून जागा जिंकायच्या असून मोदींचे हात बळकट करायचे आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, या पुढच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून एकदिलाने लढवायच्या आहेत. आपल्यासाठी लोकांचे वातावरण चांगलं आहे. विरोधकांकडे काहीही मुद्दे नाहीत. आपण काही बोलत नाही, जर आपण काही बोललो तर विरोधकांना पळता भूई थोडी होईल. त्यांचा योग्य वेळी समाचार घेतला जाईल. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण 45 हून जास्त जागा लढवू. 


हे सरकार सामान्य लोकांचे 


अंगणवाडी सेविका यांचा विषय आम्ही हाती घेतला आहे. तो पण सोडवल्याशिवाय राहणार नाही.  हे सामान्य लोकांचे सरकार आहे. महिलांना एसटी सवलत दिली, त्याचा फायदा होतोय. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा लाभ  2 कोटी लोकांनी लाभ घेतला. 1.5 वर्षापूर्वी निर्णय घेतला नसता तर शिवसेना रसातळाला गेली असती.


ही बातमी वाचा: