Rohit Pawar Press conference : "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) ज्या शहरात असतात, त्या शहरात दिवसाढवळ्या खून होतात. कदाचित त्यांच्यावर कामाचा लोड जास्त झालाय. देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेतरी एकच पद सांभाळावे. त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा", असे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. शुक्रवारी ईडीने बारामती अॅग्रोवर धाड टाकली होती. त्यानंतर पवार यांनी आज (दि.6) पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. 


ईडीच्या अधिकाऱ्यांनी बारामती अॅग्रोची कागदपत्रे ताब्यात घेतले 


रोहित पवार म्हणाले, ईडीच्या(Enforcement Directorate)अधिकाऱ्यांनी बारामती अॅग्रोची काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थितपणे सहकार्य केले. ईडीच्या अधिकाऱ्यांबाबत माझा कोणताही आक्षेप नाही. मात्र, आज आमच्यावर कारवाई होत आहे. ज्यांच्यावर भाजपने आरोप केले होते. त्यांच्यावरिल कारवाया का थांबवण्यात आल्या आहेत? असा सवालही रोहित पवार यांनी केलाय. भाजपसोबत गेलं की कारवाई थांबवण्यात येते, असा दावाही रोहित पवार यांनी केलाय. दरम्यान, माझ्या नावाने अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. 


भाजप आमदार सुनिल कांबळेंबाबत अजित पवार गप्प का?


भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर पोलिस अधिकाऱ्याला कानशिलात लगावली. तरिही अजित पवार गप्प का होते?  असा सवाल रोहित पवारांनी या वेळी बोलताना केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत असूनही मोठ्या आवाजात बोलत आहेत. आमच्यावर कारवाई होण्यापूर्वी दिल्लीत कोण गेले होते ते माहिती आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली. 


संजय शिरसाट यांच्या डोक्यावर परिणाम झालाय; रोहित पवारांचा घणाघात 


शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. गेल्या 2 वर्षांपासून ते मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही, त्यामुळे त्यांचा मेंदू छोटा झालाय. ते काहीही बोलत असतात, असे पवार म्हणाले. 


जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत पवार काय म्हणाले? 


आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामाबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. रोहित पवार म्हणाले, इतिहासात काय घडलं? आपल्याला काही माहिती नाही. आज बरोजगारीचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे. सामन्यांचा प्रश्नांवर बोलले पाहिजे. धार्मिक मुद्यावर टीप्पणी करु नये, याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला आहे. जितेंद्र आव्हाड मोठे आणि अभ्यासू नेते आहेत. मात्र, सध्याच्या वातावरणामध्ये ते स्टेटमेंट योग्य नव्हते. धर्म व्यक्तीगत प्रश्न आहे. त्याचा राजकीय वापर नको. 


इतर महत्वाच्या बातम्या 


नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवारांची उपस्थिती, मात्र उद्घाटन सोहळ्याला अजितपवारांची दांडी