Rohini Khadse : पुण्यात आज महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा पार पडत आहे. बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात राज्यातील माता-भगिनींवर अन्याय झाला आहे. द्रौपदीसारखी परिस्थिती देशात येऊ शकते, असं वक्तव्य अजित दादांनी केलं. एवढ्या लवकर अजित दादा मनुवादी विचार आत्मसात करतील, अशी अपेक्षा नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.
अजित दादांनी देशातील माता-भगिनींची माफी मागावी
ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, त्यांचे विचार येतातच. आता अजित दादांनी देशातील माता-भगिनींची माफी मागावी. संगतीचा असर चांगलाच पडलाय. महिलांची नावं दारूच्या बाटल्यांना द्यावेत म्हणजे दारूचा खप वाढेल. महिलांनी गृहिणी म्हणूनच काम करावं. सुधीर मुनगंटीवार यांनी तर कळस गाठला, थेट भाऊ-बहिणीच्या नात्यावरच प्रश्न उभा केला. ही त्यांची संस्कृती आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच पवार साहेबांच्या संस्कृतीने महिलांना सन्मान दिला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
आम्ही मधल्या काळात पाहिलं की मुलामुलींच्या जन्मदरात काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड तफावत पाहण्यास मिळाली. एक हजार मुलांच्या मागे 800 ते 850 मुली जन्माला येत होत्या. हा दर 790 पर्यंतही गेला होता. पुढे तर अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय? असा प्रसंग त्यावेळेस येईल, असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर लगेचच अजित पवार म्हणाले की, यातला गंमतीचा भाग सोडून द्या, नाहीतर म्हणतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. मला कुणाचाही अपमान करायचा नाही, असे त्यांनी म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : 'अबकी बार सुनेत्राताई पवार, आता भाकरी फिरवायची वेळ आलीय': एकनाथ शिंदे