Eknath Shinde : बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आपण पाहत आहोत. बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बारामतीकरांनी 15 वर्ष खासदार म्हणून निवडून दिले. मात्र अबकी बार सुनेत्रा ताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले आहे.
पुण्यात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, व्यासपीठावरील मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे. मगाशी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, व्यासपीठावर आते मजबूत माणसं आहेत की, 10-12 लाख मते अगदी सहज मिळतील, आणि ते बरोबर आहे. हे लोक सुनेत्रा ताईंना दिल्लीला नक्कीच पाठवतील. आज आपण पाहतोय की बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आपण इथे पाहत आहे. आज खऱ्या अर्थाने बारामतीकरांनी (Baramati Lok Sabha Constituency) परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अबकी बार सुनेत्राताई पवार
बारामतीकरांनी 15 वर्ष खासदार म्हणून निवडून दिले. मात्र अबकी बार सुनेत्राताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. बारामतीची लढाई ही ऐतिहासिक लढाई असली तरी ही वैयक्तिक लढाई नाही. ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई आहे.
ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक
या देशाला विकासाकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवत अजित दादांनी महायुतीची साथ दिली आणि खऱ्या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक एका मतदारसंघासाठी मर्यादित नाही. ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. देश बलशाली, मजबूत आणि विकसित भारत बनवणारी निवडणूक आहे. प्रत्येकाचे मत आपल्यला महत्वाचे आहे. ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
अजितदादांवर अन्याय झाला
बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम अजितदादांनी केलं आहे. अजितदादांवर अन्याय झाला आहे. म्हणून ते आमच्यासोबत आलेत. मोदींनी शरद पवारांचे बोट सोडल्यानंतर खऱ्या अर्थाने देशाचा विकास झाला आहे. सुनेत्रा पवारांचे वक्तृत्व आणि कर्तृत्व चांगलं आहे. म्हणून त्या नक्कीच खासदार होणार आहेत. आता देशात फक्त मोदी गॅरंटी चालतेय.
मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर टीका
वयाची 54 वर्ष झालीत मात्र अजून मॅच्युरिटी नाही. काँग्रेसने अनेकवेळा राहुल गांधींना लॉन्च करण्याचा प्रयत्न केला. चंद्रायन लॉन्च झालं. मात्र राहुल गांधींना लॉन्च करू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी राहुल गांधींवर केली आहे.
आणखी वाचा
Devendra Fadanvis : बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील; देवेंद्र फडणवीस