पुणे : ललित पाटील प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात कारवाई करत नसल्याने मी बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यासोबतच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणाल लक्ष घालत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 


काय म्हणाले रविंद्र धंगेकर?


ललित पाटील प्रकरणात ससुन रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. डॉक्टर ठाकूर यांना पदमुकक्त केल्यानंतर नवीन डीन डॉक्टर विनायक काळे यांना अजुनही पदभार दिलेला नाही. ससून हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. ससुन रुग्णालयातील कोणावरही पुणे पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे शासनाची नाचक्की होतेय. पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयातील क्लार्क महेंद्र शेवतेला अटक होण्याची गरज आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा होईल. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात कारवाई करत नसल्याने मी बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी दिली आहे. 


फडणवीसांचं लक्ष नाही...


यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील त्यांनी निशाणा साधला आहे. ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नाही आहे. पुणे पोलीसांना कोट्यावधी रुपयांचा  हप्ता मिळतो. पुण्यात हुक्का पार्लय, पब, बार अशा अनेक ठिकाणी गैरप्रकार होतात. या गैर प्रकारावर आळा घालण्यात यावा, असंही ते म्हणाले आहेत. 


ललिल पाटील ड्रग्स प्रकरणाबाबत विधिमंडळात विषय मांडणार आहे. यासंदर्भात विविध मागण्यादेखील करणार आहे. मात्र मला या प्रकरणाबाबत विधिमंडळात किती बोलू देतील याबाबत शंका आहे. या प्रकरणात शासनाचा हलगर्जीपणा पुढे येत आहे. हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे दिला गेला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


मागील काही दिवसांपासून पुण्यात ललित पाटील ड्रग्स प्रकरण चांगलंच पेटलं आहे. यात ललित पाटीलला अनेकांनी मदत केल्याचं समोर आलं आहे. ससून रुग्णालयातील डीन डॉ. संजीव ठाकुर आणि डॉ. देवकाते यांनी ललित पाटीलला मत केल्याचं चौकशी समितीत निष्पन्न झालं आहे. मात्र तरीही त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं धंगेकर म्हणाले आहे. 


 इतर महत्वाची बातमी-


वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फुटू शकते, 'स्वराज्य'चा इशारा, पुण्यात सर्किट हाऊसबाहेर मराठा वि. ओबीसी कार्यकर्ते आक्रमक