पुणे : मार्च महिन्यातच पुण्यात (Pune Weather Update) तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. पुण्यातील तापमानाने चाळीशी पार केली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या जीवाची दुपारी चांगलीच लाहीलाही होताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत (Weather Forecast) तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाच नाही तर रात्रीदेखील पुणे तापताना दिसत आहे. 29 मार्च रोजी पुण्याच्या रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली होती. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार शिवाजीनगरचे तापमान 23.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा 6.1 अंश सेल्सिअसने अधिक आहे. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी भागात 26 ते 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
'सध्या कमाल तापमान उच्च पातळीवर असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. २८ मार्चच्या रात्रीपासून पुण्यावर ढगाळ वातावरण वाढले आहे त्यामुळे लाँगवेव्ह रेडिएशनचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे साहजिकच गेल्या काही दिवसांत उष्णता वाढली आहे. परिणामी रात्रीच्या वेळी तापमान अधिक असल्याचं दिसून आलं आहे, असं हवामानत खात्यानं सांगितलं आहे. 'उत्तर तामिळनाडू आणि नैर्ऋत्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा आहे. ती कर्नाटक आणि मराठवाडा भागातून जाते. या प्रणालीमुळे महाराष्ट्रातील काही भागातील हवामानावर परिणाम होत आहे. पुढील 24 तासांत विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा विभागातील काही भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात पुढील 72 तास अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही, असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवडाभरापासून पुणे शहरात सरासरीपेक्षा अधिक तापमान ाची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. 27 मार्च रोजी कमाल तापमान 39.6 अंश सेल्सिअस इतके होते. 29 मार्च रोजी पुण्यात कमाल तापमान 39.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. मागील 24 तासांत तापमानात 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
पुण्यात तापमानात वाड होत असल्याने पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहनदेखील हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. दिवसभर पाणी पित राहणे,शक्यतो दुपारी बाहेर न पडणे आणि जास्त कष्ठाची कामं उन्हाच्या वेळी न करणे, असे खबरदारीचे उपाय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहेत.
इतर महत्वाची बातमी-
Weather Update : महाराष्ट्रात पावसाची शक्यता; पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज