Pune Water Cut : पुण्यातील खडकवासला (Pune Water Cut) आणि इतर धरणांमध्ये पावसामुळे मुबलक पाणीसाठा (Pune News) झाल्याने पुण्यातील पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी बैठकीत हा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपूर्वी पुण्यात पाणी कपात जाहीर करण्यात आली होती. दर आठड्याच्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्यात येत होता. आता पुणेकरांना पाणी कपातीपासून दिलासा मिळणार आहे.


पुणेकरांना पाणी कपातीपासून दिलासा


उन्हाळा सुरू झाल्यानंतर पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी कमी झाली होती. त्यामुळं पुणे महापालिकेने शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. आठवड्याच्या दर गुरुवारी शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र मागील काही दिवसांत पुणे शहरात पुरेसा पाऊस पडल्याने आणि शहराला पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने ही पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. 


संततधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ


पुण्यातील घाट विभाग आणि पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांतील पाणी पातळीने गेल्या वर्षी याच दिवशी नोंदवलेल्या जलसाठ्याची पातळी ओलांडली होती. अधिकृत आकडेवारीनुसार, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये गतवर्षीच्या याच दिवशी नोंदवलेल्या 73.63 टक्क्यांच्या तुलनेत शनिवारी (29 जुलै) 74.17  टक्के साठा झाला आहे. चार धरणांमध्ये सध्या 21.62 टीएमसी पाणीसाठा असून गेल्या वर्षी 21.46 टीएमसी पाणीसाठा होता.


कोणत्या धरणात किती पाणीसाठा?


खडकवासला धरण 1.94 टीएमसी क्षमतेच्या 98.41 टक्के भरले आहे, तर पानशेत धरण 8.45 टीएमसी क्षमतेच्या 79.34 टक्के भरले आहे.  वरसगाव धरण 9.22 टीएमसीने 71.95 टक्के भरले आहे, तर टेमघर धरण 40 टीएमसी भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग अधिकाऱ्यांनी थांबवला. यापूर्वी विसर्ग 3,424 क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला होता.


पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली


पुण्यात झालेल्या पावसामुळे पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुणेकरांची पाणीकपातीपासून सुटका झाली आहे. 28 दिवसांत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 15 टीएमसी पाणीसाठ्याची भर पडली आहे. दरम्यान, पुण्याला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये जमा झाल्यानंतर पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पूर्णवेळ पाणी मिळणार आहे. 


हे ही वाचा


Pune News : वरंधा घाटावरील प्रवास जीवावर बेतला; नीरा देवघर धरणात कार कोसळली; 1 बचावला, तिघं बुडाल्याची शक्यता