Lokmanya Tilak National Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीमध्ये एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आयोजक रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी यासंदर्भातली माहिती 'एबीपी माझा'ला दिली आहे. दरम्यान, हा कार्यक्रम जसा ठरला आहे, तसाच होणार असल्याचा दावा देखील रोहित टिळक यांनी केला आहे. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवारांनी भाजपसोबत संघर्ष करणार असल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे शरद पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. परंतु रोहित टिळकांनी केलेल्या दाव्यानंतर हा संभ्रम दूर झाल्याचं म्हटलं जात आहे.
काय म्हटलं रोहित टिळकांनी ?
रोहित टिळकांनी माझाशी संवाद साधताना म्हटलं की, हा कार्यक्रम ठरलेल्या पद्धतीने होणार आहे. तर शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांनी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच अजूनतरी कोणीही गैरहजर राहणार आहे असं कळवण्यात आलं नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. दरम्यान काँग्रेसपक्षाकडूनच हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यावरुन वादाची ठिणगी पेटली होती. यावर बोलतांना रोहित टिळकांनी म्हटलं आहे की, कॉंग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यास विरोध करत असले तरी हा पुरस्कार राजकारण विरहित आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांना ही पुरस्कार देण्यात येत असल्याचं काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी म्हटलं आहे.
शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याबाबात अनेक संभ्रम होते मात्र ते आता दूर झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच शरद पवार हे 1 ऑगस्ट रोजी राज्यसभेत उपस्थित राहणार असल्याचं देखील म्हटलं जात होतं. कारण अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारच्या अधिकाराबाबत केंद्र सरकारकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशाबाबात मतदान देखील होणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी उपस्थित राहावं असे प्रयत्न अरविंद केजरीवाल यांच्याकडून करण्यात येणार होते. तसेच ते शरद पवार यांना ते उपस्थित राहण्याचं आवहन देखील करणार होते. मात्र आता हा तिढा सुटला असल्याचं म्हटलं जात आहे.
हा कार्यक्रम सकाळी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळा हा सकाळी पार पाडून सर्व नेते मंडळी दिल्लीत हजेरी लावणार असल्याचं देखील म्हटंल जात आहे. त्यामुळे आता या दिवसाचं आयोजन कसं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.