पुणे : पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनला पुणे व्यापारी महासंघानं विरोध केला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह प्रशासकीय अधिकार्‍यांशी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. शहरात निर्बंध नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याचबरोबर नागरिक नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे दुकाने बंद करणे हा त्यावर उपाय नसल्याचं महासंघाने म्हटले.


या लॉकडाऊन संदर्भात व्यापारी महासंघाने अनेक प्रश्न उपस्थित केलेत. यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये अब्जावधी रुपयांचा व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. मात्र आता पुन्हा लॉकडाउन केल्यानं 10 टक्के सुरळी झालेला व्यापार पुन्हा अडचणीत येईल, असा दावा केला आहे. व्यापाऱ्यांना कामगारांना संपूर्ण पगार द्यावा लागत आहे. व्याजाचे हप्ते आणि त्यावरील व्याज विजेचे बिल द्यावे लागत आहे. दुकान भाडे, घर भाडे, घर खर्च असा अनेक खर्च वाढत चाललेला आहे. कोणतेही आर्थिक उत्पन्न नसल्याने गेल्या तीन महिन्यापासून आर्थिक फटका बसत आहे.


त्याचबरोबर सम-विषम असं नियोजन केल्यामुळे ही अनेक अडचणी व्यापाऱ्यांना भेडसावत असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. ग्राहक संभ्रमात असून कुठल्या दिवशी कोणते दुकानं उघडली याबाबतची कल्पना येत नाही. ग्राहकांच्या पसंतीचे दुकान बंद असल्यास त्यास परत जावे लागते. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत आहे. पी वन पी टू मुळे दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी व्यवसाय होत आहे. केवळ 15 दिवस दुकानं सुरू राहते. मात्र तीस दिवसाचा पगार द्यावा लागत असल्याचा आरोप व्यापारी महासंघाने केला आहे.


पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन


पुणे,  पिंपरी चिंचवड आणि त्यांना लागून असलेल्या गावांमधे 13 तारखेला मध्यरात्री पासून लॉकडाऊन लागू होईल. पुणे,  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीचा, पुणे कॅन्टेन्मेट आणि  हवेली तालुक्यातील गावांचा यामधे समावेश होतो. हा लॉकडाऊन 10 दिवसांसाठी म्हणजे  23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल. दहा दिवसांचा हा लॉकडाऊन पाच-पाच दिवसांच्या दोन टप्प्यांत असेल. पहिल्या पाच दिवसांमधे फक्त दूध, औषधं आणि वृत्तपत्रं सुरू राहतील. इतर सर्व गोष्टी बंद राहतील. नागरिकांनी या काळात लागणाऱ्या गोष्टी दोन दिवसांमध्ये खरेदी कराव्या लागणार आहेत. पाच दिवसांच्या दुसऱ्या टप्प्यांत लोकांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टींच्या सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या कालावधीत खरेदी करता येतील. दहा दिवसांच्या या कालावधीचा उपयोग महापालिका टेस्टींग वाढविण्यासाठी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी करेल. दहा दिवसांनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेला एकही व्यक्ती बाहेर राहू नये, असा आमचा उद्देश आहे, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.


संबंधित बातम्या