पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या भोवताली असलेल्या हवेली तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा आदेश दिला. 13 जुलै ते 23 जुलै असा 10 दिवसांचा हा लॉकडाऊन असणार आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.



कसा असेल लॉकडाऊन? 


पुणे,  पिंपरी चिंचवड आणि त्यांना लागून असलेल्या गावांमधे 13 तारखेला मध्यरात्री पासून लॉकडाऊन लागू होईल. पुणे,  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीचा, पुणे कॅन्टेन्मेट आणि  हवेली तालुक्यातील गावांचा यामधे समावेश होतो. हा लॉकडाऊन 10 दिवसांसाठी म्हणजे  23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल. दहा दिवसांचा हा लॉकडाऊन पाच-पाच दिवसांच्या दोन टप्प्यांत असेल. पहिल्या पाच दिवसांमधे फक्त दूध, औषधं आणि वृत्तपत्रं सुरू राहतील. इतर सर्व गोष्टी बंद राहतील. नागरिकांनी या काळात लागणाऱ्या गोष्टी दोन दिवसांमध्ये खरेदी कराव्या लागणार आहेत. पाच दिवसांच्या दुसऱ्या टप्प्यांत लोकांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टींच्या सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या कालावधीत खरेदी करता येतील. दहा दिवसांच्या या कालावधीचा उपयोग महापालिका टेस्टींग वाढविण्यासाठी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी करेल. दहा दिवसांनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेला एकही व्यक्ती बाहेर राहू नये, असा आमचा उद्देश आहे, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली


पुणे जिल्ह्यात आज (10 जुलै) सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या बारा तासात 183 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 979 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, औरंगाबाद आणि ठाण्यातही पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.