मुंबई : कोरोना पेशंटसाठी वरदान ठरणाऱ्या रेमंडेसिवीर आणि टोसीलिझम औषधांचा सध्या मुंबईसह महाराष्ट्रात तुटवडा निर्माण झालेला आहे. औषधांसाठी रुग्णांचे नातेवाईक माहिती मिळेल त्या दिशेला धावत आहेत. काही ठिकाणी या औषधाचा काळाबाजार होत आहे. तर हे औषध परवडत नसल्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना हतबल होऊन घरीही परतावे लागत आहे. ही संपूर्ण परिस्थिती समोर आल्यानंतर राज्य सरकारने देखील याची गंभीर दखल घेत काही वितरकांवर धाडी ही टाकलेल्या आहेत.


कोरोनाबाधित रुग्णांना उपचार देत असताना यामध्ये रेमंडेसिवीर आणि टोसीलिझम या औषधांचा वापर केला जात आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो रुग्णालयातून या रुग्णांच्या नातेवाईकांकडे या औषधांच्या प्रिस्क्रीप्शन्स डॉक्टर देत आहेत. हे औषध आपल्या रुग्णाला मिळावं यासाठी नातेवाईक माहिती मिळेल त्या दिशेने जाऊन इंजेक्शन आणि औषध मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. घाटकोपर परिसरातील एक डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडेही इंजेक्शन आणि औषधे मिळत असल्यामुळे नातेवाईकांनी या परिसरात एकच गर्दी करत आहे. रेमंडेसिवीर या इंजेक्शनची किंमत 4 हजार रुपये आहे. तर टोसीलिझम या औषधाची किंमत तब्बल 40 हजार रुपये आहे. मात्र या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मुंबईतल्या अनेक ठिकाणी ही औषध काळ्या बाजारात उपलब्ध झालेली आहेत. यांची किंमत तब्बल तीन ते चार पटीने वाढलेली आहे.


सध्या राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची परिस्थिती बिघडत असल्यामुळे या औषधाची मागणी वाढलेली आहे. अनेक नागरिकांना तासंतास रांगेत उभारल्यानंतर ही औषधे मिळत आहेत. तर काही ना खाली हात परतावं लागतं. अनेक गरीब रुग्णांचे नातेवाईक मात्र या औषधाची किंमत बघूनच पुन्हा परत माघारी फिरत आहेत. ही औषधे वेळेत न मिळाल्यामुळे अनेक रुग्ण दगावले सुद्धा आहेत.


रेमंडेसिवीर इंजिक्शन आणि टोसीलिझम औषध हे दोन्ही कोरोना रुग्णांसाठी गुणकारी असल्यामुळे या दोन्ही औषधांचा बाजारात तुटवडा निर्माण करून त्यातून काहीजणांनी अधिकचा नफा करण्यास सुरुवात केलेली आहे. या संदर्भातल्या अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार त्यांनी आज सकाळी भायखळा इथल्या एका रुग्णालयात तर घाटकोपर परिसरातील एका वितरकांना वर छापा टाकून तिथल्या परिस्थितीची स्वतः पाहणी केली. रुग्णालयात असणाऱ्या औषध दुकानांमधून रुग्णांना ही दोन्ही औषध कोणत्या किमतींना दिली जातात आणि त्या कोणत्या आधारे दिली जातात याची कसून तपासणी केली. पाहणी वेळी या दोन्ही ठिकाणी या औषधांचा साठा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचं निदर्शनास आलेला आहे. रेमंडेसिवीर इंजिक्शन आणि टोसीलिझम हे दोन्ही औषध कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. यासंदर्भात कॅबिनेट मंत्री स्तरावर बैठकाही होत आहेत. या औषधांच्या खरेदीमध्ये रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ नये तसेच ही औषधे वेळेत रुग्णांपर्यंत पोहोचावेत आणि यातील कालाबाजार थांबवावा यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे.


1- रेमंडेसिवीर इंजिक्शन आणि टोसीलिझम ही दोन्ही औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय उपलब्ध होत नाहीत.


2- रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्याशिवाय ही औषध दिली जात नाहीत.


3- रुग्णाची माहिती, कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, आणि आधारकार्ड असल्याशिवाय ही औषधे वितरित केली जात नाहीत.


4- एका बॉक्समध्ये सहा इंजेक्शन्स असतात गरजेप्रमाणे रुग्णाला दिली जातात.


डॉक्टर राजेंद्र शिंगणे


या दोन्ही औषधांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती काही रुग्णांच्या नातेवाइकांनी आमच्याकडे दिलेली आहे. याची सत्यता पडताळण्यासाठी आज सकाळपासून मी विविध ठिकाणी पाहणी करत आहे. हॉस्पिटल्समध्ये असणारे मेडिकल्स आणि वितरक यांच्याकडे सुद्धा या औषधांचा तुटवडा असल्याचे निदर्शनास येत आहे. योग्य किंमतीमध्ये ही दोन्ही औषध रुग्णांना मिळावीत यासाठी राज्य शासनाच्या वतीने या औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना सूचना देण्यात येणार आहे. नागरिकांनी सुद्धा हे औषध अधिक चढ्या भावानी किंवा काळाबाजारात घेऊ नयेत अशी आमची विनंती आहे.



श्रीधर परब (रत्नागिरी - रुग्णाचे नातेवाईक)


माझा चुलत भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याची प्रकृती बिघडत चाललेली आहे. त्यामुळे मला डॉक्टरांनी औषधाची चिठ्ठी दिली आणि हे इंजेक्शन औषधे घेण्यासाठी मी काल मुंबईत आलेलो आहे. अनेक ठिकाणी फिरलो पण हे इंजेक्शन मला मिळालं नाही. कोणीतरी मला हे औषध घाटकोपर परिसरात मिळत असल्याची माहिती दिली. सुरुवातीला हे औषध एक लाख रुपयेपर्यंत मिळेल, असंही काहीनी मला सांगितलं. त्यामुळे मी थोडा घाबरून गेलो होतो. घाटकोपरमध्ये औषधांसाठी लोकांची रांग लागली होती. त्या रांगेत मी कालपासून उभा आहे. आज संध्याकाळपर्यंत मला हे औषध मिळेल असं सांगितलं जात आहे.


बिपीन शहा (एस के डिस्ट्रीब्युटर्स)


रेमंडेसिवीर इंजेक्शन आणि टोसीलिझम या दोन्हीही औषधांची मागणी अचानकच वाढलेली आहे. आपल्याकडे जेवढा स्टॉक सिपला कंपनीकडून आलेला आहे, तो आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना पुरवण्याचा प्रयत्न करीत आहोत. अचानक मागणी वाढल्यामुळे पुरवठा कमी झालेला आहे. रेमंडेसिवीर इंजिक्शन हे 5 हजार रुपये आणि टोसीलिझम हे 31 हजार रुपयांना आम्ही उपलब्ध करून देत आहोत. ही दोन्ही औषधं जपान देशाकडून आपल्या देशात येतात. सिप्ला कंपनी मार्फत ही औषधे भारतात वितरित होतात. त्यामुळे ज्या पद्धतीने स्टॉक येईल त्या पद्धतीनेच पुढं रुग्णांसाठी ही औषधे आम्ही उपलब्ध करून देत आहोत, अशी माहिती घाटकोपर इथल्या एस के डिस्ट्रीब्युटर्स चे बिपिन शहा यांच्याकडून देण्यात आलेली आहे. या औषधांचा काळाबाजार सुरू आहे अशा बातम्या येत आहेत. मात्र आमच्या विभागा कडून आहे त्या किमतीत रुग्णांनाही औषध आम्ही उपलब्ध करून देत आहोत, असेही बिपिन शहा यांनी सांगितले आहे.


संबंधित बातम्या

Thane Lockdown Extended | ठाण्यात लॉकडाऊन आठ दिवसांनी वाढवला! आता 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन