Video ती माझ्या आयुष्यातील मोठी चूक; मृत्यूपूर्वी वैष्णवीचा मैत्रिणीसोबत संवाद,ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती
वैष्णवी हगवणे हिने तिला नेमका काय जाच झाला हे स्वतःचं एका मैत्रिणीकडे सांगितलं होतं, त्याची ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली आहे.

पुणे : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सध्या फरार असून वैष्णवीच्या वडिलांकडून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हुंडा आणि पैशांची मागणी करत हगवणे कुटुंबीयांकडून वैष्णवीचा जाच करण्यात आल्यानेच तिने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोपी वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी, पुण्यातील (Pune) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या राजेंद्र हगवणे (Rajendra hagvane) आणि त्यांचा मुलगा शुभम हगवणे फरार आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून आता स्वत: वैष्णवीचा तिच्या मैत्रिणीसोबतचा संवाद एबीपी माझाच्या हाती लागला आहे. वैष्णवीने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास तिच्याशी बोलून दाखवला. विशेष म्हणजे वैष्णवीचं लग्न प्रेमविवाह होता, पण हीच माझी सर्वात मोठी चूक असल्याचं तिने म्हटलं आहे.
वैष्णवी हगवणे हिने तिला नेमका काय जाच झाला हे स्वतःचं एका मैत्रिणीकडे सांगितलं होतं, त्याची ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली आहे. आई-वडिलांना विरोध करुन शशांक सोबत प्रेम विवाह केला, ही माझी आयुष्यातील मोठी चूक होती. आता ही चूक सुधारण्यासाठी वडील माझी साथ देणार आहेत, लवकरचं मी घटस्फोट घेणार आहे. असं वैष्णवीने मैत्रिणीसोबत व्हॉट्सअपवर बोलताना सांगितलं होतं, पण तत्पूर्वीच वैष्णवीवर टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली. त्यानंतर, आता पोलिसांनी कुठलाही दबाव न पाळता आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.
राजकीय दबावातून पहिल्या सुनेचं प्रकरण दाबलं
राजेंद्र हगवणे हे अजितदादांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. हगवणे यांचे अजितदादांशी जवळचे संबंध आहेत. राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सूनेच्या बाबतही असाच प्रकार घडला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये तिने पोलिसांत तक्रार दिली होती. ती केस अजूनही सुरु आहे. मात्र, ते प्रकरण दाबण्यात आले. हगवणेंची मोठी सून माझ्या मुलीच्या अंत्ययात्रेला आली होती. तिनेदेखील वैष्णवीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आम्हाला सांगितले. अजित पवार यांना या सगळ्याची कल्पना असावी. अजित पवार यांचे पाठबळ असल्यानेच हगवणे यांच्या मोठ्या सूनेची केस ओपन होत नाही. आमची अजितदादांपर्यंत ओळख नाही. मात्र, आम्ही अजित पवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करु. हगवणे कुटंबीयांना अटक करुन अजितदादांनी माझ्या मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे.























