पुणे :  पुणे विद्यापीठात नाटकावरुन झालेल्या राड्यानंतर ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रविण भोळे यांच्यासह  (Savitribai Phule Pune University)  सहा जणांना नाटकाबाबत अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने सरकारी पक्षाची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि डॉ. प्रविण भोळे यांच्यासह आरोपी असलेल्या पाच विद्यार्थ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.  त्यामुळे आरोपींना जामीन मिळवण्यासाठी लगेच अर्ज करता येणार आहे.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून 'जब वी मेट' हे प्रायोगिक नाटक काल सादर करण्यात आलं आहे. या नाटकात रामायणात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांचे खाजगी आयुष्य दाखवण्यात आले होते. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्रने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आक्षेप घेण्यात आला आणि नाटक बंद पाडण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नाटकाशी संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाटकाचे दिग्दर्शक,  काम करणारे कलावंत यांच्यासह ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांना अटक करण्यात आलीय.


पुरोगामी संघटनांच्या विद्यार्थ्यांकडून  कुलगुरुंना घेराव


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाटकावरुन राडा झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी हे त्यांच्या कार्यालयांतून बाहेर आल्यानंतर पुरोगामी संघटनांच्या विद्यार्थ्यांकडून त्यांना घेराव घालण्यात आला. पोलिसांनी ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे आणि विद्यार्थ्यांना अटक केली.  मात्र विद्यापीठाने या बाबतीत कोणतीही भूमिका घेतली नाही, अशी या विद्यार्थ्यांची तक्रार आहे. कुलगुरूंनी ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा रहायला हवं होतं, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.  यावेळी कुलगुरुंनी कोणतीही भूमिका नं मांडता कुलगुरु पुढे गेले. मात्र मी भूमिका मांडेन, असं त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर आता या प्रकरणात कुलगुरु नेमकी कोणती भूमिकां मांडणार, याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.


कुलगुरूंनी भूमिका मांडावी; मनसे चित्रपटसेना आक्रमक


त्यासोबत मनसे चित्रपट सेनेनेदेखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी घडलेल्या प्रकाराला थेट विरोध केला आहे. नाटक करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका मनसे चित्रपटसेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष चेतन धोत्रे यांनी घेतली आहे. शिवाय या सगळ्या प्रकरणावर विद्यापीठाचे कूलगुरूंनी योग्य भूमिका मांडावी, अशी मागणी फेसबूक पोस्ट करत केली आहे. तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमच्या घरात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी नाही. याचे भान ठेवून विद्यापीठात वागा. हीच वाक्ये मुस्लिम अथवा ख्रिश्चन पंथातील देवतांच्या तोंडातून सांगायचे धाडस यांच्यात आहे काय ?अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त हिंदू धर्मातील देवतांच्या तोंडात शिव्या देऊनच मिळते काय  ? इतके सगळे होऊन सुद्धा कुलगुरूंनी त्यांची भूमिका मांडली नाही. आता फक्त त्यांच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा आहे. दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी, असं चेतन धोत्रे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune News : पुणे विद्यापीठ चौकाजवळ मालवाहू ट्रेलर उलटला; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, वाहतुकीत बदल