पुणे : पुण्यात अपघाताचं प्रमाण आणि वाहतूक (Pune Accident) कोंडीचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक राजभवनजवळ मालवाहू ट्रेलर उलटला आहे. ब्रेमेन चौकातून येणारी वाहतूक काही बोपोडीच्या दिशेने वळवण्यात आली आहे. ट्रेलर उलटल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
गणेश खिंड रस्त्यावरील विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामासाठी आलेला मालवाहू ट्रेलर राजभवनजवळ चतु:शृंगी पोलीस ठाण्यासमोर युटर्न घेताना उलटला. पहाटेच्या चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडीमार्गे वळविण्यात आली आहे. या घटनेमुळे दररोज सकाळी विद्यापीठ चौकासमोर होणाऱ्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.
पुण्यातील विद्यापीठ चौकाजवळ प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या चौकात सुरु असलेल्या कामांमुळे या चौकात दोन ते तीन किलोमीटरपर्यंत अनेक वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पुणेकरांना रोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागतं. पुण्यात लोकसंख्या वाढल्याने अनेक परिसरात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यातला महत्वाचा चौक म्हणजे विद्यापीठ परिसर आहे. औंध, बाणेरकडे जाणारा रस्ता असल्याने रहदारी भरपूर प्रमाणात असते शिवाय मेट्रोच्या कामामुळेदेखील वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे.
पुणेकरांना सकाळीच मनस्ताप
पुण्यातील विविध भागातून औंध, बाणेर, बालेवाडी, सांगवी, हिंजवडीकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. त्यात या परिसरात अनेक मोठ-मोठे दवाखाने, कॉलेज आणि आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे शेकडो पुणेकर सकाळी या रस्त्यावरुन प्रवास करतात मात्र हा ट्रेलर उलटल्याने रस्त्यात वाहतूक कोंडी झाली. अनेकांना दीड-दोन तास एकाच ठिकाणी थांबावं लागलं परिणामी सकाळीच त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
पुणेकरांची वाहतुकीतून कधी सुटका होणार?,
रोज या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. आम्ही रोज या रस्त्याने प्रवास करताना अर्धातास आधी निघतो. मात्र आज आम्ही साधारण दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकलो होतो काही वेळाने वाहतूक वळवण्यात आली. त्यानंतर आम्ही कामाच्या ठिकाणी पोहचू शकलो. आज अपघातामुळे अडकलो मात्र रोजही अशीच वाहतूक कोंडी होते. पुणेकरांनी वाहतुकीतून कधी सुटका होणार?, असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाची बातमी-