पानशेत 39% भाटघर त्याहूनही कमी, पुण्यात राज्यातील सर्वात कमी धरणसाठा, कोणत्या धरणात किती? वाचा सविस्तर
पावसाळा सुरु होण्यास अजून जवळपास अडीच महिने शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्यास आता सुरुवात झालीय.

Maharashtra Dam Water: राज्यात उन्हाचा चटका प्रचंड वाढला असून राज्यातील धरणांचा साठा झपाट्याने कमी होत आहे. आतापासूनच राज्याच्या अनेक भागांना पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा आता सरासरी 42.46 टक्के एवढा राहिलाय. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वात कमी जलसाठा सध्या पुणे विभागात असून लहान मोठ्या सर्व धरणांमध्ये 38.41% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. (Dam Water Storage) विशेष म्हणजे मराठवाड्यापेक्षाही हा पाणीसाठा कमी असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. मराठवाड्यातही सध्या 42.35 टक्केच जलसाठा राहिलाय. पावसाळा सुरु होण्यास अजून जवळपास अडीच महिने शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्यास आता सुरुवात झालीय.
धरणातील पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन होत असून अनेक धरणांचा पाणीसाठा एप्रिल मध्यापर्यंत मायनसमध्ये जाईल असं सांगण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा चांगला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी सोडण्यात येणारी आवर्तने, पिण्याचे पाणी, औष्णीक वीज केंद्रे आणि औद्योगिक कारणांसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांची स्थिती काय आहे?
गतवर्षीच्या तुलनेत यंदा किती पाणी ?
गेल्या वर्षी याच सुमारास राज्यातील धरणसाठा हा 36.31% एवढा होता. यंदा तो 42.86% एवढा आहे. गेल्या वर्षी मराठवाडा विभागात 19 टक्के पाणीसाठा शिल्लक होता तो यंदा 42.35% एवढा आहे. 3 हजार 75 दलघमी इतका पाणीसाठा सध्या विभागातील 920 धरणांमध्ये आहे. मागील वर्षी पुण्यातील 5920 32.81% पाणीसाठा शिल्लक होता तो यंदा 38.41% एवढा आहे. या विभागात राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागात 42.82% तर अमरावतीमध्ये 51.3% पाणीसाठा यंदा शिल्लक आहे. नाशिक नगरच्या धरणांमध्ये 44.84% तर कोकणातील धरणांमध्ये 50.68% जलसाठा आहे.
पुणे विभागात कोणत्या धरणात किती?
पुण्यातील सर्वाधिक जलसाठा असणारे प्रमुख भाटघर धरणात 35.31% पाणीसाठा राहिलाय. खडकवासला मध्ये 53% पानशेत 39.75% मुळशी 44.2% पाणीसाठा शिल्लक आहे. सांगलीतील वारणा धरण 44.68 टक्क्यांवर आहे. साताऱ्यातील कोयना 44.54% असून सोलापूरच्या उजनी धरणात 15 टक्के पाणीसाठा उरलाय. कोल्हापूरच्या दूधगंगा मध्ये 32 टक्के तर राधानगरीमध्ये 56.60% पाणीसाठा राहिलाय.
मराठवाड्यात किती पाणीसाठा?
पैठणच्या जायकवाडी धरणात आज उपलब्ध पाणीसाठा 49.86% आला असून एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणीसाठा 50 टक्क्यांच्या खाली आल्याने मराठवाड्यात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.बीडचे माजलगाव धरण 38.13 टक्के तर मांजरा 42.37% जलसाठा शिल्लक राहिला आहे. हिंगोलीच्या सिद्धेश्वर 61.10% आणि येलदरी धरणात 59.35% पाणी शिल्लक असून नांदेड विष्णूपुरी धरणात 39.87% पाणी आहे. धाराशिवला उजनीतून पाणीपुरवठा होतो. सध्या उजनीत 19.31% पाणीसाठा शिल्लक आहे.
हेही वाचा:
मराठवाड्यात पाणीटंचाईला सुरुवात; विभागात 42.90% जलसाठा, नाशिक नगरच्या धरणांमध्ये काय स्थिती?























