Pune Rain Update : विजयाचा गुलाल अन् पुण्यात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी; भर पावसात कार्यकर्त्यांचा जल्लोष
शहरातील सर्वच भागांत आज संध्याकाळी मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. पुण्यात भर पावसात कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळांच्या विजयाचा जल्लोष केला.
पुणे : शहरातील सर्वच भागांत आज संध्याकाळी मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. पुण्यात भर पावसात कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळांच्या विजयाचा जल्लोष केला. भर पावसात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला.ताशी 40 -50 किमी वेगाने वाहणारे वारे, ढगांचा गडगडाट, विजा आणि काही भागात गारा पडल्याचेही यावेळी अनुभवायला मिळाले. विविध भागांमध्ये तब्बल 1 ते 2 तास सुरू असलेल्या या पावसामुळे मंगळवारी सायंकाळी पुणेकरांना आल्हाददायक वातावरणाची अनुभूती मिळाली.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार, शहरातील बहुतांश भागात मंगळवारी सायंकाळी 4:30 नंतर जोरदार पाऊस अनुभवण्यास मिळाला. मात्र राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसल्याने, हा मान्सून चा पाऊस नसून मान्सून पूर्व पाऊस असल्याची माहिती हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. पुणे शहर आणि लगतच्या परिसरावर ढगांची निर्मिती झाल्याने हा पाऊस पडला. दरम्यान हवामान विभागातर्फे पुणे शहर आणि परिसरासाठी 6 जूनपर्यंत मेघ गर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपातील पाऊसासाठी 'यलो अलर्ट ' देण्यात आला आहे.
राज्याच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यात पुण्यात मुरलीधर मोहोळांनी बाजी मारली आणि रवींद्र धंगेकरांना पराभूत केलं. त्यामुळे मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता. पुण्यातील अनेक परिसरात मुरलीधर मोहोळांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. ऐनवेळी पावसाने हजेरी लावली. कार्यकर्त्यांनी न थांबता भर पावसात जल्लोष साजरा केला.