Pune Rain Update: पुण्यासह घाटमाथ्याला मुसळधार पावसानं झोडपलं; धरणांमधून विसर्ग वाढवला, नदीकाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pune Rain Update: नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा भोर प्रशासनाकडून देण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता निरा नदीकाठी नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर रात्री मुसळधार (Pune Heavy Rain) पाऊस झाला आहे. 100 मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे. डोंगर माथा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. भोर, मुळशी, जुन्नर, भीमाशंकर या डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस झाला आहे. खिलेश्वर परिसरात 198 मिलिमीटर पाऊस झाला, तर भीमाशंकर परिसरात 128 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मुळशीतील धावडे कॅम्प परिसरात ही 175 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर भोर तालुक्यातील शिरगावमध्ये 128 मिलिमीटर पाऊस झाला आहे तर हिरडोशीमध्ये 123 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
निरा देवघर धरणाचे पाच दरवाजे उघडले
पुणे जिल्ह्यातील निरा देवघर धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. सुमारे 4500 क्युसेसने पाण्याचा विसर्ग निरा नदीत सुरू आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विसर्गात वाढ करण्यात आली आहे. सध्या धरण 87 टक्के भरले असून जलसाठा वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा भोर प्रशासनाकडून देण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता निरा नदीकाठी नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
भाटघर धरणातून विसर्ग वाढवला
भाटघर धरण 95.29% झाले असल्याने धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करणेसाठी भाटघर धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्राद्वारे सुरू असलेल्या 1631 क्युसेक विसर्ग मध्ये वाढ करून सांडव्याद्वारे1650 क्युसेक विसर्ग असा एकूण ३२८१ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाचे प्रमाण कमी/जास्त झाल्यास त्यानुसार येव्यामध्ये वाढ/घट झाल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी/जास्त करण्यात येईल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये नदीच्या पात्रात कुठल्या विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
























