(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Porsche Car Accident : किडनी तस्करीचा आरोप ते सुनिल टिंगरेंची शिफारस अजय तावरेचे एकशे एक कारनामे; गॉडफादर नक्की कोण?
पोर्शे कार अपघाताप्रकरणी वरिष्ठ अधिकारी डॉ. अजय तावरेला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि हा तावरे नेमका कोण आहे? असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला.
पुणे : पोर्शे कार अपघाताप्रकरणी वरिष्ठ अधिकारी डॉ. अजय तावरेला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि हा तावरे नेमका कोण आहे? असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला. 2007 साली ससूनमध्ये रुजू झालेल्या तावरेसाठी सतरावं वर्ष कसं धोक्याचं ठरलं? तावरेची मजल थेट मंत्रालयातील सहाव्या मजल्यापर्यंत कशी पोहचली? या तावरेचा गॉडफादर नेमका कोण आहे? हेच सगळं जाणून घेऊया...
डॉ. अजय तावरे सध्या पुणे पोलिसांच्या कोठडीची हवा खातोय. तावरेने पोर्शे कार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रताप केलाय. त्यानंतर तावरेचे एकनाअनेक कारनामे चव्हाट्यावर येऊ लागलेत. शिरूरच्या रेहाना शेखचा 11 ऑगस्ट 2018 ला डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाला, असा आरोप करत मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली. तपास तावरेंकडे आला आणि त्यावेळी ही पैशांच्या हव्यासापोटी तावरेंनी डॉक्टरांच्या बाजूनं अहवाल दिल्याचा दावा रेहानाच्या दोन्ही कुटुंबीयांनी केला.
डॉक्टर अजय तावरेचं सतरावं वर्ष धोक्याचं?
- मुंबईच्या जे जे वैद्यकीय महाविद्यालयातून 2006 साली पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
- 2007 साली ससून रुग्णालयात एन्ट्री झाली.
- काही महिन्यांतच वैद्यकीय अहवालात गैरप्रकार करत, तावरेंनी भ्रष्टाचाराचा पाया खणला.
- या आरोपानंतर 2008 मध्ये अंबेजोगाई वैद्यकीय महाविद्यालयात बदली झाली.
- काही महिन्यात जॅक लावून तावरे ससूनमध्येचं परतले.
-2012 साली शवविच्छेदन अहवालात फेरफार केल्याचा आरोप तावरेंवर झाला.
- या आरोपानंतर ही 2013 मध्ये प्रशासन अधिकारी करण्यात आले, त्यानंतर उपाधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.
- पुढच्या दोनचं वर्षात म्हणजे 2015 साली वैद्यकीय अधीक्षक पदी वर्णी लागली.
- अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य पदावर असताना 2022 साली तावरेंवर थेट किडनी तस्करीचा आरोप झाला, मग अधीक्षक पदावरून उचलबांगडी केली गेली.
- पण अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंच्या शिफारशीने डिसेंबर 2023 मध्ये तावरे पुन्हा अधीक्षक पदी विराजमान झाला.
- अशातच आयसीयू मधील एका रुग्णाला उंदीर चावला अन तावरेंची पुन्हा हकालपट्टी झाली.
- सध्या तावरे फॉरेन्सिक मेडिसिन ऍण्ड टॉक्सोलॉजी विभागाच्या प्रमुखपदी आहे, पण पोर्शे अपघातादिवशी सुट्टीवर असताना रक्ताचे नमुने बदलण्याचा कारनामा तावरेनेच केला.
वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी सुरु केल्यानंतर वरिष्ठांची मर्जी कशी संपादन करायची, हे डॉक्टर अजय तावरेने पुरतं जाणलं आणि ससूनमध्ये काही महिन्यांतच आपलं बस्तान बसवलं. त्यानंतर पुढची सतरा वर्ष तो या ना त्या पदाच्या निमित्ताने ससून आणि त्याच्याशी संलग्न संस्थांमध्ये तो कार्यरत राहिला. या कारकिर्दीत गैरकारभार आणि त्यातून भ्रष्टाचाराची मालिका सुरु झाली
या कारकिर्दीत तावरेने अनेक राजकीय नेत्यांची वाट्टेल ती कामं केली. त्याद्वारे तावरेंनी आमदार, खासदार ते मंत्र्यांशी जवळीक साधली. अशातच पोर्शे कार अपघातात अटक झाल्यावर तावरेची मंत्रालयातील सहाव्या मजल्यापर्यंत कशी मजल पोहचली? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
ससूनमधील गैरकारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून तावरे खबरदारी घ्यायचा. अग्रवालशी झालेला संवाद समोर येऊ नये म्हणून तावरे व्हाट्सअप कॉलिंग करायचा, पण पोलीस तपासात त्याचं बिंग फुटलंच. पोर्शे अपघातात तावरेचा राजकीय कॉल झाला का? अशी शंका ही घेतली जातीये.
ससूनमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचं अजय तावरे हे एक उदाहरण आहे. मात्र असे अनेक तावरे ससूनमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेत. अनेकदा गैरव्यवहार समोर येतात, मात्र चौकशीच्या नावाखाली वेळ मारून नेली जाते. यावेळी अजय तावरेसह तिघांना अटक झाली. मात्र गेली सतरा वर्षे अजय तावरेला वेळोवेळी संधी देणाऱ्या, त्यांना पाठीशी घालणाऱ्या, त्यांच्या गॉड फादरपर्यंत पोलिसांचा तपास पोहचणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाची बातमी-