पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या नर्सचाही समावेश आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही कारवाई करण्यात आली. पृथ्वीराज मुळीक आणि नर्स नीलिमा घोडेकर अशी अटकेत असलेल्या दोघांची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाला भारती विद्यापीठ परिसरात एक व्यक्ती रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक किमतीत विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अधिक किमती इंजेक्शन देताना पृथ्वीराज मुळीक याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने हे इंजेक्शन त्याची मैत्रीण असलेल्या नीलिमा घोडेकर हिच्याकडून घेतल्याचे सांगितले. नीलिमा ही वाकड येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. त्यानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. याकरिता पोलिसांची दहा विशेष पथके नेमण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.
इतर बातम्या :
- Remdesivir : रेमडेसिविरचा काळाबाजार! आता जिल्हास्तरावर कंट्रोल रुम, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- रेमडेसिवीर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांकडून उत्पादकांची बैठक, दिले 'हे' महत्वाचे निर्देश