मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणार तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी  रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हास्तरावर कंट्रोल रुम तयार केल्या जाणार आहेत.  राज्य आरोग्य सेवा आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. 


रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. त्यात खासगी दुकानदार जास्त किंमत लावत आहेत. त्यामुळे सध्या ऑक्सिजन कंट्रोल रूममध्ये रेमडेसिवीरबाबत तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. त्याचे निराकरण स्थानिक FDA च्या कार्यालया मार्फत होणार आहे. जिल्हा स्तरावर तांत्रिक समिती गठीत करून त्या मार्फत रॅन्डम पद्धतीने खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर उपयोग नीट होत आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. रेमडेसिवीरची गरज भासल्यास राज्यस्तरावरील FDA च्या कंट्रोल रूमशी संपर्क करून कारवाई होणार आहे. जिल्हास्तरावर यासाठी कंट्रोल रूम स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे. 


सोलापुरात समिती गठित
 
रेमडेसिवीरबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून समितीची घोषणा करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात  कंट्रोल रूम कार्यरत होणार आहे. रेमेडेसिवीरच्या वापरलेल्या बॉटल नष्ट करता येणार नाहीत. समितीने तपासणीसाठी मगितल्यांनंतर रिकाम्या बॉटल्स दाखवाव्या लागणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. 


पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झालाय. अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांनी सापळा रचून टोळीचं बिंग फोडलं. विविध रुग्णालयात काम करणाऱ्या चार वॉर्ड बॉयला बेड्या ठोकण्यात आल्या असून तीन रेमडेसिवीर इंजेक्शन ही जप्त करण्यात आलीत. आत्तापर्यंत त्यांनी एकूण 40 रेमडेसिवीर विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकरा ते पंधरा हजारांदरम्यान याची विक्री केल्याची कबुली ही आरोपींनी दिली आहे. मयत कोरोना बाधितास देऊन उरलेले किंवा एखाद्या कोरोना बाधित गरज नसताना त्यास रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याचं दाखवलं जायचं. तेच इंजेक्शन घेऊन हे काळाबाजार करायचे. मुरलीधर मारुटकर हा बाणेर कोव्हिड सेंटर, अजय मोराळे हा औंधच्या मेडी पॉईंट हॉस्पिटलमध्ये, प्रताप जाधवर हा तळेगावच्या मायमर हॉस्पिटलमध्ये तर हा आदित्य मैदरगी सांगवीच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. ही सर्व रुग्णालयं शासनाकडून चालवले जातात. त्यामुळे यात प्रशासनाचा ही हात आहे का? इतर ही रुग्णालयातील वॉर्ड बॉय या काळाबाजारात सहभागी असण्याची शक्यता आहे.