पुणे : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच 30 एप्रिलपर्यंत राज्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील लग्नसोहळ्यांसोबतच अंत्यविधीसाठीही निर्बंध लावण्यात आले आहेत. लग्नसोहळ्यासाठी 25 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांनाच परवानगी दिली आहे. परंतु, तरीही राज्यात प्रशासनानं लागू केलेल्या नियमांची पायामल्ली होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. असाच एक प्रत्यय पुण्यातील लोणी काळभोर परिसरात आला आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांकडे नागरिक सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक असाच प्रकार उघडकीस आला आहे. एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. वृद्धाच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यविधीला अनेक लोकांनी उपस्थिती लावली. तसेच अंत्यविधी करताना नातेवाईकांनी मयत व्यक्तीचे पाय धुऊन पाणीही प्यायले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतविधीसाठी केवळ 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तरिही या अंत्यविधीसाठी शंभरहून अधिक लोक उपस्थित होते. 


पुण्यातील लोणी काळभोर येथील घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका सामाजिक कार्यकरत्यानं सोशल मीडियावर पोस्ट करुन हा सर्व प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत कारवाई करणार असल्याचं सांगितलं. अशाप्रकारे नियमांचं उल्लंघन करुन जर कोणी लग्नसोहळा अथवा अंत्यसंस्कार करत असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलीस तातडीनं घटनास्थळी उपस्थित राहून संबंधित व्यक्तींवर कारवाई करतील अशी माहितीही वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे. 


महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती


महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात 58  हजार 412 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे  52 हजार 412 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 39 लाख 59 हजार 240 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 76 हजार 520 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के  झाले आहे.


राज्यात सोमवारी एकूण 351 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.5६ टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 824 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोंद झालेल्या 351 मृत्यूंपैकी 220 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 85 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 46 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :