(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime : आई वडिलांच्या भांडणात 8 वर्षांच्या मुलीला लागली बंदुकीची गोळी; पुण्यातील धक्कादायक घटना
पती-पत्नीच्या झालेल्या भांडणात पतीच्या हातून चुकून बंदुकीची गोळी लागून त्यांची 8 वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील नऱ्हे परिसरातील हेरंब हाईटसमध्ये घडली आहे.
Pune Crime News: पती-पत्नीच्या झालेल्या भांडणात पतीच्या हातून चुकून बंदुकीची गोळी लागून त्यांची 8 वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) नऱ्हे परिसरातील हेरंब हाईटसमध्ये घडली आहे. पती दारुच्या नशेत होता. दोघांची भांडणं टोकाला गेली त्यातून चूकून पतीच्या हातून मुलीवर गोळी झाडली गेली. शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली
राजनंदिनी पांडुरंग उभे असं जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक पांडुरंग तुकाराम उभे यांना अटक केली आहे. पांडुरंग उभे यांच्याकडे परवाना असलेलं रिव्हॉल्वर आहे. उभे यांचा पुण्यात कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्याच्या व्यवसायात सध्या तणावाचं वातावरण असल्याने आणि आर्थिक विवंचनेत असल्याने ते व्यसनाच्या आहारी गेले. रोज दारु पिऊन घरात राडा करायचे. यावरुन त्या दोघांची भांडणं व्हायची. शुक्रवारी देखील याच कारणामुळे त्यांच्यात वादावादी झाली. हा वाद टोकाला गेला. त्यावेळी पांडुरंग यांनी रिव्हॉल्वर काढून पत्नीवर उगारले. हे भांडणाचं रुप पाहून मुलगी भांडणात पडली. त्यावेळी नशेत असलेल्या पांडूरंगचा रिव्हॉल्वरवरील ताबा सुटला आणि गोळी थेट मुलीच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली आणि मुलगी जागीच खाली कोसळली.
रक्ताच्या थोराळ्यात पडली होती मुलगी
वडिलांकडून दारुच्या नशेत मुलीवर गोळी झाडल्या गेली. त्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच शेचारचे घरात शिरले. त्यावेळी मुलगी रक्ताच्या थोराळ्यात पडली होती. शेजारच्यांनी मुलीला लगेच भारती हॉस्पिटलला नेले. घडलेल्या या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार केल्यानंतर पांडुरंग हा घरातच होते. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
उस्मानाबादमधील घटना ताजी असतानाच दुसरी घटना समोर
दोन दिवसांपुर्वी उस्मानाबादमध्येदेखील अशीच घटना घडली होती. घरातील कुत्र्याने मटण खाल्लं आणि त्याचा राग वडिलांनी मुलीवर काढला. पोटच्या मुलीवर थेट गोळीबार केला. या प्रकरणामुळे सगळ्या परिसरात हळहळ व्यक्त केली गेली. मुलीची हत्या करणाऱ्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्ला गावात ही घटना घडली होती. काजल मनोज शिंदे असं या मृत मुलीचं नाव होतं. रविवारी खाण्यासाठी घरात मटण आणलं होतं. मात्र या मटणाकडे मुलीचं दुर्लक्ष झालं. कुत्र्याने ते मटण खाल्लं त्यावरुन मुलगी आणि आई वडिलांमध्ये वाद निर्माण झाला होता. यातून तिच्यावर गोळीबार करण्यात आला. महाराष्ट्रातील ही घटना ताजी असतानाच पुण्यातूनही तशीच घटना समोर आली आहे.