Maharashtra SSC Deaf Student: दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थांनी चांगले गुण मिळवले. सर्वसाधारण विद्यार्थांनी जल्लोषही साजरा केला. ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला. मात्र याच जल्लोषात मल्हार देशपांंडे आपल्या आईचा हात धरून कोपऱ्यात उभा होता. मल्हार हा कर्णबधिर आहे. त्याला दहावीच्या परिक्षेत 88.40 टक्के मिळाले. त्यामुळे त्याने देखील जल्लोषात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मल्हारला मिळालेल्या यशामुळे त्याचे आई-वडिल भारावून गेले आहे.


मल्हार जन्मत: आहे कर्णबधिर


मल्हार ओंकार देशपांडे जन्मत: कर्णबधिर आहे. तो पुण्यातील टिळक रोडवरील  गोळवलकर गुरुजी शाळेचा विद्यार्थी आहे. इयत्ता पहिलीपासून तो गोळवलकर शाळेत शिकतो. लहानपणापासून तो प्रचंड हुशार असल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला सामान्य मुलांच्या शाळेत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर कॉक्लियर इम्प्लांट (Cochlear Implant) नावाची सर्जरीसुद्धा करण्यात आली होती. मात्र ती सर्जरी यशस्वी झाली नाही. त्याच्या एका कानाची नस लहान आहे आणि एका कानाला नसंच नाही आहे. त्यामुळे या सर्जरीचा उपयोग होणार नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं.


सर्जरी केल्यानंतर अनेक कर्णबधिर मुलांना 80 टक्के ऐकू येण्याची शक्यता असते. मात्र मल्हारच्याबाबतीत ती शक्यता 10 टक्के होती. तरीदेखील त्यांनी सर्जरी करुन घेतली होती. मल्हारला दोन्ही कानाने काहीही ऐकू येत नाही त्यामुळे हातवारे करुन किंवा लिप रिडिंग करुन लोक काय बोलतात?, याचा तो अंदाज लावतो.


ऑनलाईन शिक्षण आणि शिक्षकांची मदत


मल्हार देशपांडे हा इयत्ता पहिलीपासून गोळवलकर गुरुजी शाळेत शिकतो. सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिकला तर मल्हारमध्ये न्यूनगंड राहणार नाही, या हेतूने त्याच्या आईवडिलांनी सामान्य शाळेत त्याची भर्ती केली. कोरोनामुळे सगळ्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु होत्या. त्यावेळी मल्हार नवव्या वर्गात होता. दहावीतसुद्धा ऑनलाईन पद्धतीने त्याला अभ्यास करावा लागला. मात्र ऐकू येत नसल्याने त्याला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. शाळेत शिकवलेलं आणि ऑनलाईन क्लासमध्ये शिकवलेलं त्याची आई रोज त्याला शिकवायची. त्याची आकलन शक्ती चांगली असल्याने तो अनेक गोष्टी लवकर शिकू लागला. शाळेच्या शिक्षकांचं देखील त्याला सहकार्य लाभलं त्यामुळे तो दहावीत उत्तम मार्कांनी पास होऊ शकला.


कर्णबधिरांच्या शाळेत भर्ती का केलं नाही?


मल्हारची आई सई देशपांडे पेशाने डॉक्टर आणि वडिल वकील आहेत. त्यांनी अनेकजणांकडे चौकशी केल्यानंतर मल्हारला सामान्य मुलांच्या शाळेत भर्ती करण्याचा निर्णय़ घेतला. कर्णबधिरांच्या शाळेत त्याच्या सारखेच सगळे विद्यार्थी असतील. त्यामुळे त्याला बोलतासुद्धा येणार नाही. सामान्य शाळेत किंवा सामान्य माणसांच्या संपर्कात राहिला तर तो निदान थोडं बोलू शकेल. त्याचा सर्वांगिण विकास होईल, असं त्याची आई सई देशपांडे सांगतात.


मल्हारने दहावीत मिळवलेल्या यशामुळे त्याचे आई-वडिल , कुटुंबीय आणि शिक्षकवर्ग प्रचंड आनंदी आहे. मंदारचा जन्म झाल्यापासून मी डॉक्टरकीची प्रॅक्टीस सोडली आणि संपुर्ण लक्ष त्यावर केंद्रीत केलं होतं माझ्या या मेहनतीचं मल्हारने मला फळ दिलं असं त्यांची आई सांगते.