फलटण :  बंदी असून ही सर्रास विकला जाणारा चायनीज मांजा अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पतंग उडवताना अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या मांजचा वापर करतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून चायनीज मांजामुळे अनेक लोकांना इजा झाली आहे तर अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. 8 जून रोजी फलटण तालुक्यातील 4 वर्षीय संस्कृती भंडलकरच्या गळ्याला चायनीज मांजा कापला आणि तिच्या गळ्याला 40 ते 50 टाके पडले आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन देखील डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे संस्कृतीचा जीव वाचला आहे.


संस्कृती ही फलटण तालुक्यातील काळज गावची आहे. 8 जूनला संस्कृतीचे वडिल संस्कृतीसह त्यांच्या भावाला घेऊन आपल्या कामानिमित्त फलटणला आले होते. काम आटपून काळजला परत जात असताना संस्कृतीचा चायनीज मांजामुळे गळा कापला गेला.  यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली. चायनीज मांजा कापल्यामुळे संस्कृतीच्या गंभीर इजा झाली होती. तिचा गळा कापल्याने रक्तस्त्राव देखील मोठ्या प्रमाणात होत होता. फलटण येथील लाईफ लाईनमधील डॉक्टरांच्या अथक परिश्रामुळे संस्कृतीला जीवनदान मिळाले. संस्कृतीच्या मानेला 40 ते 50 टाके पडले. चायनीज मांजा हा एखाद्या शस्त्रापेक्षा कमी नाही अस डॉक्टरांचे म्हणणं आहे. 


दरवर्षी चायनीज मांजा कापल्यामुळे 20 ते 30 जण लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये पेंशट येतात अशी माहिती तिथल्या डॉक्टरांनी दिली. चायनीज मांजाला बंदी असली तरी अनेक जण त्याचा वापर करीत असतात. त्यामुळे अनेकांना इजा होते. संस्कृतीला आजच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जी वेळ माझ्या मुलीवर आली आहे ही कुणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून चायनीज मांजा वापरण्याऱ्या लोकांवर कारवाई व्हावी अशी मागणी सोमनाथ भंडलकर यांनी केली आहे..


कायद्याने चायनीज मांजाला बंदी आहे. परंतु काहीजण अद्यापही अशा मांजाला पसंती देतात. पंरतु काही विकृत लोकांच्या अशा कृत्यामुळे निष्पाप लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.