Ajit Pawar on SSC Result 2022  : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपली आवड, कल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावी, परीक्षेतील यशाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केलं आहे. 


अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय 


महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा दहावीचा निकाल हा 96.94 टक्के लागला आहे. परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा असला तरी अंतिम साध्य नाही. त्यामुळं अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शैक्षणिक कारकिर्दीच्या बरोबरीनं आपलं व्यक्तिमत्व अष्टपैलू, सर्वांगसुंदर घडविण्याचा प्रयत्न करावा. शैक्षणिक कारकिर्द ठरवण्यासाठी योग्य शाखा निवडण्याचा दहावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. परंतू विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कला, क्रीडा, छंद आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.


दहावीचा निकाल 96.94 टक्के


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09  टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. 


सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा


राज्यात 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के इतका लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली. 


महत्वाच्या बातम्या: