Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 17 Nov 2021 10:42 AM
पुण्यात गेल्या 24 तासात 106 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 69 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 106 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 69 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 495682 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 843 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 5176 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

कोंढव्यात हुक्का गोडावूनवर पोलिसांचा छापा; 22 लाखाचा मुद्देमाल जप्त

मुंढवा पोलिसांनी येवलेवाडी परिसरातील एका हुक्का गोडावूनवर छापा मारून कारवाई केली. या ठिकाणाहून पोलिसांनी 22 लाख 17 हजार रुपये किंमतीचा हुक्का आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या ठिकाणाहून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शहेजाद अश्रफ रंगूनवाला (वय 37), नवेद मुंने खान (वय 21) आणि शरीफ मोहम्मद मालापुरी (वय 18) या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2018 चे कलम 4 अ 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासराववर पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला मारहाण आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29, रा. करिष्मा सोसायटी कोथरूड)  यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

पार्श्वभूमी

लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीचे मुख्य उपसंपादक राजेंद्र येवलेकर यांची आत्महत्या



लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीचे मुख्य उपसंपादक राजेंद्र येवलेकर यांनी कोथरुडमधील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजेंद्र येवलेकर विज्ञान विषयक लिखाणासाठी ओळखले जात.  त्यांच्या मागे पत्नी,  मुलगी आणि तीन भाऊ आहेत.  राजेंद्र येवलेकर यांनी आत्महत्या का केली हे मात्र अजुन समजु शकलेले नाही.  कोथरुड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


पुण्यात नवले पुलाजवळ एक अपघात



पुणे नवले पुलाजवळ आज सकाळी पुन्हा एक अपघात झाला आहे. बंगळुरू मुंबई महामार्गावर सातारा कडून मुंबई कडे जाणार कंटेनर पलटी झाला आहे. या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नसली तरी हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. गेल्या महिन्याभरात नवले पुलावर 5 ते 6 वेळा अपघात झाला आहे. अनेकदा तक्रार करूनदेखील प्रशासन काहीच करत नाही. 


वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 डिसेंबरला पार पडणार संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा



पुण्यातील देवाच्या आळंदीत 2 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा झालेल्या कार्तिकी एकादशी प्रमाणेच होणार आहे. आळंदीत आज पार पडलेल्या बैठकीत तसा निर्णय झाला आहे. देवस्थान, पोलीस यंत्रणा आणि महसूल प्रशासनाचे यावर एकमत झालंय. पण याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी राजेश देशमुख घेणार आहेत. त्यांच्यासोबत गुरुवारी दुपारी तीन वाजता बैठक होईल. तर याची घोषणा शुक्रवारच्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार करण्याची शक्यता आहे.


अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर


अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याच नक्की झाला आहे.  या दौऱ्यात पुण्यातील वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेशन या संस्थेत अमित शहांकच्या उपस्थितीत सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आलय. या कार्यक्रमानंतर अमित शहा पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचीही शक्यता आहे.


 




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.