Pune Dengue : पुण्यात काही दिवसांपासून डेंग्यूची साथ (Dengue) वाढत आहे.  त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे महापालिका हद्दीत आत्तापर्यंत जुलैमध्ये डेंग्यूचे 92 संशयीत रुग्ण आढळले आहेत. आरोग्यतज्ज्ञांनी डेंग्यूपासून बचाव करण्याचा नागरिकांना सल्ला दिला आहे. 


पुणे महापालिका हद्दीत जुलैमध्ये डेंग्यूचे 92 संशयित रुग्ण आढळले. त्यातील 12 जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 10 ते 40 कोटी नागरिकांना डेंग्यूचा संसर्ग होतो. क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर डास असणारे ठिकाणे शोधून औषधांची फवारणी केली जात असून डेंग्यू रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालय आणि कमला नेहरू रूग्णालयातील वॉर्ड  सज्ज करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.


आरोग्यमंत्री तानाजी सावंतानी डेंग्यू आणि बाकी साथीचे रोग रोखण्यासाठी काही सल्ले दिले आहेत. डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे आणि पाणीसाठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे  नियंत्रण ठेवावे. शीघ्रकृती पथकाद्वारे करावयाचे कामे  तसेच इतर सूचनांसाठी एक पुस्तिका तयार करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा. ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे साथ रोगाबाबतची माहिती देण्यासाठी फलक लावण्यात यावेत, अशा सूचना यावेळी  त्यांनी केल्या.  साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही त्यांनी सांगितलं आहे. 


सगळ्या गावांत उपाययोजना राबवाव्या'


आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंग्यू, मलेरिया, जापानी मेंदूजवर, लेप्टोस्पायरोसिस या आजारांना प्रतिबंधासाठी जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.  गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. आश्रम शाळा यांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत नियमित भेटी देण्यात येत आहेत.  पाणी गुणवत्ता नियंत्रण 76 हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत. पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करून प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.


 परिसर स्वच्छता, डासांपासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले आहे. प्रयोगशाळा सिद्धता, पुरेसा औषध साठा,शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना आणि गाव पातळीवर साथ रोग सर्वेक्षण तसेच अंतर विभागीय समन्वय आणि आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे


हेही वाचा-


Dengue in Children : पावसाळ्यात लहान मुलांचा डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा