Pune water Cut : दक्षिण पुण्यात एका (water Cut) आठवड्यासाठी पाणी कपात मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पुणेकरांना पाणीकपातीपासून दिलासा मिळाला आहे. वडगाव, सिंहगड रोड, धनकवडी परिसरात पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. 


वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या सिंहगड रस्ता, धनकवडी ते येवलेवाडी या दक्षिण पुण्याच्या भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी विस्कळित झाल्याने 17 ते 23 जुलै या आठवड्यातील सर्व दिवस पाणी पुरवठा सुरू असेल. खडकवासला धरणातील पाणी साठा कमी झाल्याने महापालिकेने मे महिन्यापासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा सर्वाधिक फटका हा वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागाला बसला आहे.


पाणीकपात मागे


दोन ते तीन दिवस या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने वडगाव केंद्राच्या हद्दीतील पाणी पुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले. पाणी पुरवठा विभागाने वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या भागातील पाणी पुरवठा बंद ठेवला पण जलकेंद्रात बिघाड झाल्याने या भागात दोन दिवस पाणी नव्हते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे पुणे महापालिकेने या भागात पुढच्या आठवड्यातील पाणी बंद मागे घेतले आहे. उर्वरित शहरात ठरल्याप्रमाणे गुरूवारचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


...तर पाणी कपातीवरील निर्बंध उठणार!


खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर दर गुरुवारी असलेले पाण्याचे निर्बंध उठवले जातील, असं म्हणणे आहे. त्यामुळे जोपर्यंत बऱ्यापैकी पाऊस होत नाही आणि धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होत नाही तोपर्यंत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. वरिष्ठ स्तरावर चर्चा करून योग्य वेळी पाणी निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. येत्या काळात पावसाची गरज आहे. सरासरी पाऊस झाला की धरणाच्या पातळीत वाढ होईल आणि पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असंही सांगण्यात आलं आहे. 


दर गुरुवारी होणाऱ्या पाणी कपातीमुळे जवळपास 20 टक्के भागात शुक्रवार आणि शनिवारी अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या समस्येबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारी केल्या आहेत. यावर उपाय म्हणून जलवाहिनीतील हवेचा दाब कमी करण्यासाठी 150 हून अधिक एअर व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. या उपायामुळे अनेक भागात पाणीपुरवठा सुधारला आहे. मात्र काही भागात अजूनही पाण्याची समस्या कायम आहे. 


हेही वाचा-


Sudhir Deshmane Viral Gym Trainer : पांढरी दाढी-पांढरे केस, डब्ल्यूडब्ल्यूईच्या सुपरस्टारसारखा फिटनेस, सोशल मीडियावर सगळ्यांना घाम फोडणारा हा व्यक्ती आहेत तरी कोण?