(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमस्थळी भाजप आणि राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
Pune News : पुण्यात स्मृती इराणी यांच्या ताफ्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न देखील केला.अंडी फेकणाऱ्या राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील बालगंधर्व येथील कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. महागाईविरोधात आंदोलन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन महिला कार्यकर्त्या कार्यक्रमस्थळी गनिमी काव्यानं गेल्या होत्या, पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत सभागृहाबाहेर लोटलं. दरम्यान दुसरीकडे स्मृती इराणी ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या त्या हॉटेलबाहेर देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात आंदोलन करत थेट हॉटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात स्मृती इराणी यांच्या ताफ्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न देखील केला. बालगंधर्व रंगमंदिराबाहेर ही घटना घडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्याकडून अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला. अंडी फेकणाऱ्या काही महिला कार्यकर्ता ताब्यात घेतले आहे. आज सकाळपासूनच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. तसेच स्मृती इराणी थांबलेल्या हॉटेलमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
शांततेच्या मार्गाने महागाईच्या विरोधात आपला विरोध प्रकट करीत असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत एक पुरुष महिलेला मारहाण करतो हे अजिबात स्वीकारार्ह नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
वाढत्या महागाईमुळे निषेध
वाढत्या महागाईमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून स्मृती इराणी यांचा निषेध होत आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे शिवानंद द्विवेदी लिखित अमित शहा आणि भाजपची वाटचाल या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आल्या. या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते
चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न
इराणी यांना भेटण्यासाठी महिला काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आला, तसेच त्यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिलांनी यावेळी केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना रोखलं, यावेळी त्यांच्यात झटापट झाल्याचं देखील दिसून आलं. यानंतर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनला नेण्यात आले.