पुणे : खासगी गाडीवर लाल दिवा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरवर कब्जा करणाऱ्या प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची सध्या जोरदार चर्चा सुरुय. आता त्यांची वाशिमला प्रोबेशनरी आयएएस म्हणून बदली झालीय. वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावणं, खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावणं ते गाडीवर महाराष्ट्र शासन असे बोर्ड लावणं असे आरोप त्यांच्यावर आहेत. पुणे (Pune) जिल्ह्यात प्रोबेशन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्या रूजू झाल्या होत्या, पण या आरोपांनंतर त्यांची उचलबांगडी झालीय.
पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांनी मसुरी मधील प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी या पदाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात पाठवण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला . हा निर्णय राजकीय प्रभावातून घेतला गेला असल्याची चर्चा लागलीच सुरु झाली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी सहाय्य्क जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वीच पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना व्हॉट्सअप द्वारे मेसेज करून आपल्याला स्वतंत्र केबिन,स्वतंत्र कार, दिमतीला एक शिपाई आणि राहण्यासाठी निवासस्थान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र एका प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्ह्याधिकाऱ्याला या सुविधा देणे नियमांत बसत नाही. मात्र निवासस्थान उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं.
कशी झाली पुण्याला बदली?
3 जून 2024 ला म्हणजे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होण्याच्या आदल्या दिवशी पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. पूजा खेडकर यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण कालावधी तीन जून ते 14 जून असा निश्श्चित करण्यात आला . या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी , निवासी जिल्हाधिकारी आणि इतर शाखा अधिकाऱ्यांसोबत बसून कामकाज कसे चालते याचा अनुभव घेणं अपेक्षित होतं . त्यांनतर त्यांची रवानगी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून इतर प्रशासकीय कार्यालयांमध्ये होणार होती .
असा झाला केबिनचा शोध सुरु
पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम या महिला असल्यानं मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांनी कदम यांच्या केबिनमध्ये बसून कामकाजाचा अनुभव घ्यावा असं त्यांना सांगण्यात आलं . मात्र पूजा खेडकर यांनी ही सूचना नाकारली आणि स्वतंत्र कक्षाची मागणी केली. त्यामुळे पूजा खेडकर यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील चौथ्या मजल्यावरील कुळकायदा शाखेतील स्वतंत्र कक्षात बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. मात्र त्यांनी ती नाकारली. त्यानंतर पूजा खेडकर आणि त्यांचे सनदी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले वडील दिलीप खेडकर यांनी पुणे जिल्हाधीकारी इमारतीत स्वतः फिरून हव्या त्या केबिनचा शोध सुरु केला .
वडिलांनी दिला दम
चौथ्या मजल्यावरील खनिकर्म शाखेच्या शेजारी असलेले व्ही आय पी सभागृह त्यांनी बैठकीसाठी शोधून काढले. 12 जूनला या व्ही आय पी सभागृहात त्यांनी बसायला सुरुवात केली. मात्र थोडयाच दिवसांत ही बैठक व्यवस्था देखील त्यांना नकोशी वाटायला लागली. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी चिडून तिथे असलेल्या तहसीलदारांना "तुम्ही तुमची संपूर्ण शासकीय सेवा पूर्ण होईपर्यंत अप्पर जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहचू शकणार नाही. खेडकर मॅडम येण्या आधीच त्यांची सर्व व्यवस्था होणे अपेक्षित होते. सर्व बैठक व्यवस्था केल्याशिवाय जायचे नाही " असा दम दिला.
वडिलांची मुलीला बसायला स्वतंत्र जागा मिळण्याची मागणी
त्यानांतर पूजा खेडकर आणि त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पुण्याचे अप्प्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याच केबिनवर दावा सांगितला. अजय मोरे यांनी त्यांच्या अँटी चेंबरमध्ये बसायला पूजा खेडकर यांना परवानगी देखील दिली. मात्र तरीही पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी आपल्या मुलीला बसायला स्वतंत्र जागा का मिळत नाही? ही इमारत कोणी बांधली? इमारत बांधताना प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी बसण्यास स्वतंत्र व्यवस्था का करण्यात आली नाही अशी विचारणा केली .
अँटी चेंबरवर केला दावा, इंटेरिअर बदलले
पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे हे 18 ते 20 जून या कालावधीत शासकीय कामासाठी मुंबईत मंत्रालयात गेले होते . त्यावेळी पूजा खेडकर यांनी अँटी चेंबरमधील टेबल , खुर्च्या आणि सोफा बाहेर काढायला लावला आणि त्या जागी स्वतःचे कार्यालय थाटले आणि त्यासाठी टेबल , खुर्च्या आणि इतर फर्निचरची व्यवस्था करायला हाताखालील अधिकाऱ्यांना भाग पाडले .
ऑडीने ऑफिसला प्रवास, कारवर लावला लाल दिवा
अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरेंनी याची तक्रार जिल्हाधिकारी सुहास दिवसेंकडे केल्यानंतर त्यांनी अँटी चेंबरमधील फर्निचर आणि टेबल - खुर्च्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला . त्यानंतर पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी दिवसे यांना तुम्ही असे करू नका , अन्यथा माझा अपमान होईल असा मेसेज पाठवला . या कालावधीत पूजा खेडकर या स्वतःच्या ऑडी कारवर शासकीय वाहनांवर असतो तसा अंबर दिवा लावत होत्या .
बाप - लेकीच्या आरेरावीला कुणाचं राजकीय पाठबळ?
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे स्वतः सनदी अधिकारी राहिलेले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलंय आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी नुकतीच पार पडलेली लोकसभेची निवडणूक नगर दक्षिण मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती . त्यामुळे खेडकर बाप - लेकीच्या या आरेरावीला कुणाचं राजकीय पाठबळ आहे असा प्रश्न विचारला जातोय.
हे ही वाचा :