Pune Ganeshotsav 2022 : पुण्यातील नऊ गणपती मंडळाचा धाडसी निर्णय; एकत्र मिरवणुक काढत दिला सलोख्याचा संदेश
सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीने पुण्यात पहिल्यांदाच नऊ सार्वजनिक गणेश मंडळांना एकत्र आणून नवा इतिहास रचला. पुण्यातील धनकवडी परिसरातील मंडळांनी एकत्र येत मिरवणूक काढली होती.
Pune Ganeshotsav 2022 : सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीने पुण्यात पहिल्यांदाच नऊ सार्वजनिक गणेश मंडळांना एकत्र आणून नवा इतिहास रचला. पुण्यातील धनकवडी परिसरातील मंडळांनी एकत्र येत मिरवणूक काढली होती. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
गुलाब नगर, धनकवडी ते मोहन नगर, धनकवडी अशी ही जाहीर मिरवणूक भक्तिभावाने, उत्साहात आणि जोशात निघाली. यावेळी संपूर्ण मिरवणुकीत ज्ञानप्रबोधिनी बँडने जल्लोष केला होता.
प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता वैभव वाघ, आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, वर्षा तापकीर, सुमित खेडेकर, विशाल तांबे यांच्यासह शेकडो भाविक देखील सार्वजनिक गणेश मिरवणूकीत सहभागी झाले होते. पोलीस विभागाने केलेल्या नियमांचे पालन करून पुढील मंडळे सामाईक मिरवणुकीसाठी एकत्र आले. केशव मित्र मंडळ, पंचरत्नेश्वर मित्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, पंचतारांकित मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, एकता मित्र. मंडळ, धनकवडीतील रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळ या सगळ्या मंडळांचा समावेश होता.
एकत्र येण्याचं आवाहन
सगळ्या मंडळांमध्ये स्पर्धा असते मात्र सगळ्यांनी या मिरवणुकीसाठी एकत्र यावं आणि मंडळातील मतभेद किंवा स्पर्धा दुर करावी. नागरीकांनी एकत्र यावं यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. मात्र आपण त्यात स्पर्धा करतो. असं न करता या नऊ मंडळांनी धाडसी निर्णय घेत ही मिरवणूक काढली होती.
मिरवणुकींच्या मानासाठी वाद
पुण्यात एकीकडे मिरवणुकीचा वाद सुरु आहे. विसर्जनाच्या दिवशी मानाच्या गणपतीची मिरवणुक पहिले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सगळ्या वादाला बाजूला ठेवत धनकवडीतील आठ मंडळांनी एकत्र मिरवणुक काढतं उत्तम कामगिरी केली आहे. भविष्यात पुण्यात एकसंघ सार्वत्रिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. धनकवडीतील मंडळांनी एकत्र येऊन जे धाडस दाखवले आहे ती पद्धत हळूहळू समाजात रुजली पाहिजे, असे मत मंडळांनी व्यक्त केले आहे.
पुण्यात एक से बढ़कर एक मंडळं
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुमारे 3500 गणपती मंडळं पुण्यात आहेत. प्रत्येक मंडळांची वेगळी वैशिष्ट्य आहेत. त्यात अनेक मंडळांमध्ये स्पर्धा असते. देखावा, मिरवणुक कोणाची उत्तम असेल यात स्पर्धा असते. कुणी सर्वोत्तम ढोल ताशा पथकाचं वादन करतात तर कोणी डोल्बी वाजवत बाप्पाचा जल्लोष साजरा करतात. त्यामुळे या मंडळांमध्ये कायम स्पर्धा बघायला मिळते.