पुणे : बिहारहून पुण्यात येत पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला. त्यानंतर पत्नीचा खून करण्यासाठी बिहारला निघालेल्या पतीस पिंपरी चिंचवड पोलिसांनी कल्याणमध्ये बेड्या ठोकल्या. हा पती बिहारच्या सरकारी शाळेत शिक्षक आहे. राजीव कुमार असं त्याचं नाव असून त्याने मित्र धीरज कुमारच्या साथीने हे कृत्य केलं आहे. मयताचे प्रविण महतो असं नाव होतं. बावधनमध्ये तो नर्सरी चालवत होता. याच नर्सरीत धीरज कामाला होता. याचं धीरजला राजीवने गाठलं अन पत्नीसह प्रियकराच्या हत्येचा कट आखला. 


पत्नीच्या संपर्कात बिहारमधील घराशेजारी राहणारा प्रविण आला


राजीवचं सात वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र, संसारात मिठाचा खडा पडला होता. गेल्या चार वर्षांपासून दोघेही विभक्त झाले. अशातच पत्नीच्या संपर्कात बिहारमधील घराशेजारी राहणारा मात्र पुण्यात नर्सरी चालवणारा प्रविण आला. मोबाईल नंबरची देवाण-घेवाण झाली, तास तासभर दोघांमध्ये संवाद होऊ लागला. पती सोबतच्या वादानंतर पत्नीला खांद्याची गरज होती, प्रविणने तो खांदा पुढं केला. हळूहळू मैत्री घट्ट झाली अन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रविण बिहारला गेला की दोघांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. दीड महिन्यांपूर्वी पत्नी आणि प्रविणच्या भेटीतील एक फोटो राजीवच्या निदर्शनास पडला अन त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. याच रागात त्याने पत्नी आणि प्रविणचा काटा काढायचा कट रचला. 


अन् चाकूने प्रविणचा थेट गळा चिरला


मात्र प्रविणचा पुण्यातील पत्ता कसा शोधायचा? असा प्रश्न उभा ठाकला असतानाचं राजीवने प्रविणच्या पुण्यातील नर्सरीवर काम करून बिहारला परतलेल्या धीरजला गाठलं. मग दोघांनी पुण्याची रेल्वे धरली अन सोमवारी पुण्यात दाखल झाले. मंगळवारी रात्री 12च्या सुमारास दोघे बावधन येथील नर्सरीवर पोहचले अन् चाकूने त्यांनी प्रविणचा थेट गळा चिरला. तो मृत पावला आहे याची शहानिशा केली अन तिथून पुणे रेल्वे स्टेशन गाठलं. आता पुढं पत्नीचा खून करण्याच्या उद्देशाने पुण्यातून बिहारचा प्रवास सुरु झाला. दरम्यान बावधनमध्ये एकाची हत्या झाल्याची खबर हिंजवडी पोलिसांना लागली. 


हिंजवडी पोलिसांच्या पथकांनी तातडीनं मुंबईच्या दिशेने कूच केली


पोलिसांनी घटनास्थळ गाठलं, हातात कोणताही पुरावा नव्हता. अशातचं प्रविणच्या अनैतिक संबंधांबाबत पोलिसांच्या हाती माहिती लागली. मग तपास त्या दृष्टीने सुरु झाला अन राजीवचे लोकेशन काढले असता, तो पुण्यात आल्याचं अन बिहारला पळून जात असल्याचं निदर्शनास आलं. हिंजवडी पोलिसांच्या पथकांनी तातडीनं मुंबईच्या दिशेने कूच केली. कल्याण पोलिसांनाही याबाबत कळवलं, तिथल्या पोलिसांनी रेल्वे स्टेशन गाठलं. बुधवारच्या सकाळी राजीव आणि धीरज बिहारच्या रेल्वेत बसणार होते, तत्पूर्वीच कल्याण पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.


सकाळी साडे नऊ वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी कल्याण पोलिसांच्या मदतीनं अवघ्या नऊ तासांत या खूनाचा पर्दाफाश केला यामुळं आणखी एक जीव वाचला. काही मिनिटं उशीर झाला असता तर राजीवने बिहारमध्ये पोहचून पत्नीचाही खून केला असता. त्यामुळं पिंपरी चिंचवड पोलिसांच्या किमान या कारवाईचे कौतुक करायला हवं. पण शहरातील इतर गुन्हे आटोक्यात केव्हा येणार? हा खरा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर सर्वसामान्यांना हवं.


इतर महत्वाच्या बातम्या