नाशिक : नाशिकमधील गौळने गावातील विजय सहाने यांनी आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या केल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली. बॉस कंपनीत कामगार असलेल्या विजय सहाने यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी कंपनीवर आरोप केले आहेत. विजयच्या आत्महत्येचे कारण हे कंपनीतील प्रशासन असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 


नाशिकच्या बॉश कंपनीमध्ये विजय सहाने हे गेल्या बारा वर्षांपासून कामावर आहेत. कंपनीच्या जाचक नियमांमुळे विजय हे गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते आणि त्यामुळे त्यांनी आपली पत्नी आणि नऊ वर्षाच्या मुलीसोबत आत्महत्या केल्याचं पाऊल उचललं असल्याची माहिती विजयच्या कुटुंबांनी दिली. विजयच्या कुटुंबीयांनी बॉश कंपनीवर गंभीर आरोप केल्यानंतर या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. 


कंपनीवरील आरोपांची चौकशी व्हावी


विजय सहाणे यांनी त्यांच्या राहत्या घरी कुटुंबासोबत आत्महत्या केल्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी देखील भेट दिली. सहाने कुटुंबाच्या आत्महत्येनंतर कुटुंबांने केलेल्या आरोपाची सखोल चौकशी व्हावी आणि यासंदर्भात नाशिक पोलिसांनी देखील गांभीर्याने तपास करावा असे निर्देश आमदार खोसकर यांनी दिले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत सीबीआयच्या माध्यमातून तपास करावा आणि संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 


कंपनीकडून प्रतिक्रिया नाही


सहाने कुटुंबाच्या आत्महत्येनंतर माध्यमांनी बॉस कंपनी प्रशासनासोबत देखील बोलण्याचा प्रयत्न केला. बॉस कंपनी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने कंपनी प्रशासनावरील संशय अधिकच गडद होत आहे. मात्र या संदर्भात इंदिरानगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या संदर्भात नेमकी काय कारणं समोर येतात आणि विजय सहाने यांनी कुटुंबासोबत आत्महत्या का केली हे पोलिसांच्या तपासानंतर समोर येईल.


ही बातमी वाचा: