पुणे : दारुच्या नशेत मारहाण करणाऱ्या (Pune Crime News) पतीला भीती दाखविण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतून घेतलेल्या महिलेला पतीने पेटवून दिल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पती अक्षय मारुती कुंजीर आणि सासू आशा मारुती कुंजीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमृता आणि अक्षय कुंजीर यांचे 2020 मध्ये लग्न झाले आहे. अक्षय दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत होता. अक्षयने 12 सप्टेंबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दारुच्या नशेत घरातील सामानाची तोडफोड केली. त्यानंतर पत्नीला घरातून निघून जा,असे सांगितले. त्यावर पत्नीने छळास कंटाळून मी मरुन जाते, असे म्हणत घरात शेतीपंपासाठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. त्यावेळी पतीने काडीपेटीने आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात अमृता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर सासू आशा कुंजीर यांनी हा प्रकार कोणाला सांगू नको, असे म्हणत सुनेला दमदाटी केली म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
सासूने त्रास दिला सुनेने थेट आयुष्यच संपवलं...
काहीच दिवसांपूर्वी खडक पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने सासूच्या छळाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. लग्नाच्या एका वर्षानंतर ही घटना घडली आहे. या प्रकरणी खडक पोलीस स्टेशने कारवाई केली असून आरोपी सासूवर गुन्हा दाखल केला होता. सायली सौरभ भागवत (वय 22, रा. दत्तवाडी, पुणे) असे या मृत्यू झालेल्या सुनेचं नाव होतं. या प्रकरणी सासू राजेश्री राजेंद्र भागवत (साईबाबा मंदिर शेजारी, दत्तवाडी पोलीस चौकी) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत रवी अनिल अहिरे ( वय 39, रा, हिराबाग पुणे) याने फिर्याद दिली होती.
कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ
राज्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचार सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात होत असल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात कौटुंबिक हिंसाचारात चांगलीच वाढ झाल्याचं घडलेल्या घटनांमधून समोर येत आहे. कधी पतीकडून मारहाण तर सासू सासऱ्यांकडून छळ केल्याचं समोर येतं. त्यामुळे या प्रकारच्या हिंसाचाराला आळा घालणं गरजेचं झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या